हिंगोली - शेतकरी निसर्गासमोर हतबल झाला आहे. त्याहूनही गंभीर म्हणजे शेतात जलस्रोत आहे. मात्र, अनेकदा विद्युत वितरण कंपनीकडे वीज जोडून देण्यासाठी खेटे घेऊन वीज जोडणीच झाली नाही. त्यामुळे पाणी असूनही डोळ्यादेखत शेतातील उभे पीक वाळून जाण्याची शक्यता आहे. मात्र, शेतकऱ्यांनो आता अजिबात घाबरून जावू नका. सौर कृषी पंप योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे दिवसा सिंचन करणे सोयीचे होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात नेहमीच रोहीत्र जळण्याच्या घटना घडत आहेत. मुख्य म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे जलस्त्रोत आहेत, मात्र त्यावर वीजपुरवठा जोडणीसाठी अनेकदा कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. एवढेच नव्हे तर कित्येक शेतकऱ्यांना आंदोलन, उपोषण करूनही विद्युत जोडणी मिळालेली नाही. तसेच काही शेजारी पाजारी शेतकऱ्यांमुळे देखील बरेच गरजवंत शेतकरी विद्यूत जोडणीपासून दुरावलेले आहेत. मात्र आता मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत आपल्या शेतीनुसार आपल्या विहीर किंवा बोअरवर सौर कृषी पंप बसविला जाणार आहे. यासाठी जलस्त्रोत आहे, पण वीजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी कोटेशन देखील अतिशय कमी प्रमाणात आहे.
एवढा भरावा लागणार लोकवाटा
सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेणाऱ्या खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 5 एचपीसाठी 24 हजार 710, तर एससी, एसटीसाठी 12 हजार 335 अन 3 एच पीसाठी खुल्या प्रवर्गात 16 हजार 560, 8 हजार 280 एवढा लोकवाटा भरावयाचा आहे.
या वेबसाईटवर करा अर्ज
लाभार्थ्यांना कृषी पंप योजनेत कृषी पंप मिळवण्यासाठी महावितरण तर्फे स्वतंत्र वेबपोर्टल निर्माण केले. त्यामुळे वेबपोर्टलवरून किंवा WWW. mahadiscom/ solar या लिंकवर जाऊन ए - 1 अर्ज भरावा.
अर्ज भरताना मात्र शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची नितांत गरज आहे. जिल्हास्तरावर केवळ मंजूर अन नामंजूर एवढेच अधिकार दिलेले असल्याने, तुमची एक चूकही अर्ज अपात्र ठरण्यास कारणीभूत ठरू शकते.
प्रस्ताव मंजूर होताच शेतकऱ्यांने दिलेल्या मोबाईलवर एसएमएस येणार आहे. तेव्हा लोकवाटा भरून आपण या योजनेतून सौर कृषीपंपाचा लाभ घेऊ शकाल. हे सर्व व्यवस्थित सुरू असले, तरीही वरिष्ठ स्तरावरून मंजुरीच थांबलेली आहे. ती नेमकी आचारसंहितामुळे की दुसरेच काही, हेच अद्याप कळायला मार्ग नाही. याची कल्पना देखील विद्युत वितरण कंपनीला नाही. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.