हिंगोली - आज एका तरुण शेतकऱ्याने गळफास ( Young Farmer Suicide ) घेऊन आत्महत्या केल्याची घटना सेनगाव तालुक्यातील म्हाळसापूर येथे उघडकीस आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 36 कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाकडून मिळाली आहे. किसन अशोक माळेकर (27) रा. म्हाळसापूर ता. सेनगाव, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. माळेकर यांचा 11 महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता, त्यांच्याकडे एकूण सात एकर शेती आहे. शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा गाडा हाकत असत. मात्र, मागील काही दिवसांपासून शेतीतील नापिकीमुळे माळेकर हे चांगलेच हतबल झाले होते.
शेताची पाहणी करण्यासाठी निघाले होते -
शेतात पीक पाहणी करण्यासाठी माळेकर हे नेहमीच जात असत, त्याचप्रमाणे आजही शेताची पाहणी करून येतो, असे सांगून ते शेतात गेले. मात्र, बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी शेतात जाऊन पाहिले, तर माळेकर हे शेतातील झाडाला गळफास घेतलेल्यावस्थेत आढळून आले.
वर्षभरात 36 शेतकऱ्यांने मृत्यूला कवटाळले -
संपूर्ण जगाला हादरून टाकलेल्या कोरोनामुळे प्रत्येक जण हैराण झाले आहे. यामध्ये शेतकरीदेखील भरडला गेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांवर कर्जाचा बोझा झाला असल्याने, आतापर्यंत जिल्ह्यातील 36 शेतकऱ्यांने मृत्यूला कवटाळले आहे. जिल्हास्तरिय शेतकरी आत्महत्या समिती समोर एकूण 36 प्रस्ताव मांडले होते. त्यापैकी 33 प्रस्ताव मंजूर झाले असून, 2 प्रस्ताव हे अपात्र ठरले आहेत, तर एक प्रस्तावाची चोकशी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाकडून मिळाली आहे.