हिंगोली : निळकंठ पुंडलिक पतंगे (47) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. पतंगे यांच्याकडे एकूण पाच एकर शेती आहे. त्याच शेतीवर त्यांचा कुटुंबाचा गाडा चालत आहे. निळकंठ पुंडलिक पतंगे यांनी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँक शाखेतून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र निसर्गाचा प्रकोप आणि अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच खरिपाची उणीव रब्बीमधून काही प्रमाणात तरी भरून निघेल या आशेने पतंगे यांनी जीवाचे रान करत रब्बीचे पीक घेतले. मात्र हरभऱ्याचे जेमतेम उत्पन्न झाल्याने आता डोक्यावरील कर्ज नेमके फेडायचे कसे याच विवंचनेत पतंगे राहत होते.
पायावर करायची होती शस्त्रक्रिया : निळकंठ पुंडलिक पतंगे यांच्या पायाला गेल्या काही दिवसापासून जखम झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र अगोदरच डोक्यावरील कर्जाचा बोजा हलका झाला नाही. पायावर शस्त्रक्रियेसाठी जवळपास डॉक्टरांनी पाच लाख रुपयांचा खर्च सांगितला होता. आता एवढे पैसे नेमके जमायचे कुठून याच चिंतेत निळकंठ पुंडलिक पतंगे राहत होते. दोन दिवसांपूर्वी अचानक ते घरातून बेपत्ता झाले होते. नातेवाईकांनी त्यांचा खूप शोध घेतला मात्र ते सापडले नव्हते. त्यामुळे नातेवाईकांनी विहिरीचा शोध घेण्यास सुरुवात केली तर एका विहिरीवर त्यांचे वाहन, चष्मा आणि चपला दिसून आल्या. त्यामुळे नातेवाईकांनी विहिरीचे पाणी दोन मोटरने उपसले तर पाण्यामध्ये पतंगे यांचा मृतदेह आढळून आला.
आखाडा बाळापूर पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव : घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार नागोराव बाभळे यांनी धाव घेतली. घटनेचा पंचनामा सुरू असून या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा : Misbehave With Japanese Girl : होळीच्या दिवशी जपानी तरुणीशी केले गैरवर्तन, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली