हिंगोली - सेनगाव तालुक्यातील खुडज येथे मशागत केलेल्या शेतीवर वनविभागाने जाणिवपूर्वक मोठ-मोठे खड्डे खोदले. त्यामुळे हे खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी मानवी हक्क व सुरक्षा दल आणि भारतीय दलीत आदिवासी पँथरच्यावतीने सिताराम घनघाव यांच्या कुटुंबीयांनी खड्ड्यात जिवंत समाधी आंदोलन सुरू केले आहे.
खुडज येथे गावालगत वनविभागाची शकडो एकर जमीन आहे. या जमिनीवर खुडज येथील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल व मागासवर्गीय घटकातील अनेक जणांनी शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केले. हे अतिक्रमण चार दोन वर्षांपासून नव्हे तर गेल्या वीस वर्षेपासून आहे. शेतकरी दरवर्षी शेतीची मशागत करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, वनविभागाच्या चौकीदाराने जाणिवपूर्वक या शिवारातील असलेले अतिक्रमण निष्कासित न करता, इतर मोकळ्या पडीत जमिनीवर खड्डे न खोदता केवळ माझ्याच शेतात खड्डे खोदले असल्याचा आरोप घनगाव यांनी केला. त्यामुळे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट करुन त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आणल्याचे घनघाव यांनी सांगितले.
विषेश म्हणजे शेतात मोठे खड्डे करताना वनविभागाने घनघाव यांना कुठलीही पूर्वकल्पना,नोटीस दिलेली नाही. त्यामुळे संबधित वनविभागाच्या चौकीदाराची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी घनघाव कुटुंबीयांनी केली. या आंदोलनात त्यांची वयोवृद्ध आई सहभागी झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे त्यांच्या आईची प्रकृती बिघडलेली आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.