हिंगोली - वसमत तालुक्यातील कुरुंदा या गावातील नागरिकांना गावातून वाहणाऱ्या नदीच्या पुराचा त्रास नेहमीच सहन करावा लागतो. आठ वर्षानंतर हे गाव पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहे. पुराचे पाणी गावात शिरल्याने ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागली. पुराच्या पाण्यात किती मुकी जनावरे वाहून गेली ( Hundreds Of Cattle Were Carried Away ) याची मोजदाद करणेही अवघड आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिल्लीतून हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून ग्रामस्थांची तात्पुरत्या निवासाची तातडीने व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. पूरस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत.
कुरुंदा गावापासून जलेश्वर नदी वाहते - या नदीला अनेकदा पूर आला असून गाव जलमय झाले आहे. 2016 मध्येही या नदीला पूर आला होता. गावामध्ये सर्वत्र पाणी शिरले होते. तीच परिस्थिती शुक्रवारी रात्रीच्या पावसाने निर्माण झाली आहे. आठ वर्षानंतर पुन्हा तीच परिस्थिती कुरुंदा वासियांवर आली आहे. नेहमी पुरात जाणारे गाव पाहूनही प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना झाल्याचे दिसत नाही. रात्री घरांमध्ये कमरेइतके पाणी साचल्यावर नागरिकांना जीव वाचविण्यासाठी उंचावरील ठिकाणी धाव घ्यावी लागली.
वाहने गेली वाहून - गावात घराबाहेर, रस्त्यावर उभी असलेली वाहने पुराच्या पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेली. पुराचे पाणी गोठ्यांमध्ये शिरल्याने तिथे बांधलेल्या जनावरांना प्राण गमवावे लागले. तर काही मोकळी असलेली जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली.
संरक्षण भिंत उंच करण्याची मागणी - 2016 मध्ये या जलेश्वर नदीला पूर आल्यानंतर प्रशासनाने संरक्षक भिंत बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. तथापि त्यानंतर हे काम का थांबले याचे कारण कोणालाही कळू शकले नाही. गाव पुन्हा पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांनी संरक्षक भिंतीचे काम तातडीने करावे, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा - Cloudburst Situation In Nanded : नांदेड शहरासह अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस