हिंगोली - शरीराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डोळे. तेच नसतील तर हे जग आपण पाहू शकत नाही. त्यामुळे डोळे हे मानवासाठी खूप मोलाची देणगी आहे. रक्तदानाप्रमाणेच नेत्रदान सर्वश्रेष्ठ मानले जाते. अनेकजण मरणानंतर नेत्रदान करण्याचा संकल्प करतात, तर अनेक वैद्यकीय सेवा बजावणारे नेत्ररोग तज्ज्ञ आपल्या सेवेचा उपयोग करून अनेकांना दृष्टी देण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकीच हिंगोलीतील डॉ. किशन लखमावर यांनी आतापर्यंत 60 हजार जणांना दृष्टी दिली. प्रतीक फाउंडेशनमार्फत 1 हजार 600 जणांच्या डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया केली आहे. त्यामुळे हिंगोलीतील दृष्टीदाता म्हणून डॉ. लखमावर यांची ओळख निर्माण झाली आहे. आंतराष्ट्रीय नेत्रदान दिनानिमित्त ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा.
दरवर्षीच 10 जून हा आंतरराष्ट्रीय नेत्रदान दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दृष्टी ही अतिशय महत्त्वाची असते, दृष्टी नसेल तर हे विश्वसौंदर्य आपण आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही. जन्मतःच अंध असलेल्या लोकांना दृष्टी देण्यासाठी लाख प्रयत्न करावे लागतात. अनेकजण हे प्रयत्न करतानाही दिसतात. मात्र, ज्यांना दृष्टी आहे आणि ती काही आजारांमध्ये गेली, तर त्यांना पुन्हा दृष्टी देण्यासाठी डॉक्टर पुरेपुर प्रयत्न करत असतात. डॉ. लखमावार यांनी प्रॅक्टीस सुरू केली तेव्हापासून आतापर्यंत जवळपास २० वर्षांच्या काळावधीमध्ये ६० दृष्टीहीन लोकांवर शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी दिली आहे. अनेक गरीभ लोक पैशाच्या अडचणीमुळे डोळ्याची शस्त्रक्रिया करू शकत नाही. त्यांची अडचण समजून डॉ. लखमावार त्यांच्यावर उपचार करत असतात. त्यांनी अशा लोकांना परत दृष्टी मिळवून देण्यासाठी २००३ मध्ये स्थापन झालेल्या प्रतीक फाऊंडेशनचा आधार घेतला. तेव्हापासून जिल्ह्यातील नरसी येथे संत नामदेव जन्मोत्सवानिमित्त नेत्ररोग शिबीर घेऊन गरजूंची तपासणी केली जाते. शिबिरात औषध गोळ्या मोफत वाटप करून ज्यांना शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे अशांची मोफत शस्त्रक्रिया केली जाते. आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील जवळपास 1600 जणांची या शिबिरामार्फत तपासणी करून फाउंडेशनच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया केली आहे. लखमावार यांचे हेच सामाजिक कार्य पाहून त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आजही ते गोरगरिबांची शस्त्रक्रियाही मोफत करतात. ते म्हणतात की, आर्थिक अडचण ही फार विदारक परिस्थिती असते. या विदारक परिस्थितीमध्ये प्रत्येकालाच आपल्या डोळ्यावर खर्च करणे शक्य नाही. काही-काही तर वयोवृद्ध झाल्यामुळे त्यांना दृष्टी परत मिळवण्यासाठी पैसे मिळत नाहीत. त्यामुळे फाउंडेशनचा आधार घेऊन अशा निराधारांना दृष्टी देण्याचा प्रयत्न करत असल्याचे डॉ. किशन लखमावार यांनी सांगितले. मोफत शस्त्रक्रिया करण्यासह इतरही सामाजिक कार्य करतात इयत्ता दहावीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते आई वडिलांच्या स्मृतींप्रित्यर्थ बक्षीस देतात. सोबतच इतरही उपक्रम राबवतात.