हिंगोली - दिवसेंदिवस वाढदिवस साजरा करण्याची एवढी क्रेज वाढलीय की, चौकाचौकात शुभेच्छांचे फलक लावून त्यावर अनेकांनी शुभेच्छा दिल्याचे आपण बघत असतो. अशाच एका पशुप्रेमीने आपल्या 'ज्युली' नावाच्या श्वानाला फलक लावून शुभेच्छा दिल्या आहेत. या अवलियाने चक्क शुभेच्छांचे फलकच झळकवत त्यावर विविध जातींच्या श्वानांचे फोटो छापले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे ज्युली नामक श्वानाच्या वाढदिवसाचे फलक लावण्यात आले आहेत. हे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. मागील ३ वर्षांपासून ५ ते ६ जण मिळून ज्युलीचा वाढदिवस साजरा करतात.
३ वर्षांपूर्वी एक नुकतेच जन्मलेले श्वानाचे पिल्लू गल्लीत फिरत होते. त्याला दुसरी भटकी श्वान मारणार तोच काही मुलांनी त्या पिल्ल्याचा बचाव केला आणि सर्वांनी मिळून त्याची व्यवस्था केली. या पिल्ल्याचे नाव ज्युली ठेवण्यात आले. तेव्हापासून दरवर्षी जुलीचा वाढदिवस साजरा केला जातो. इतकेच नव्हे तर, तिच्या वाढदिवशी गल्लीतील अनेक श्वानांना भोजन दिले जाते. एवढेच काय तर या दिवशी ज्युलीची सजावट देखील केली जाते.
यावर्षी पहिल्यांदाच जुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा फलक लावून देण्यात आल्या आहेत. तर, फलकावर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जातीचे श्वानही दिसत असल्याने, पाहणारे मात्र चांगलेच चक्रावून जात आहेत. मोठ्या आनंदात जुलीला फलकाद्वारे शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, काहींना हा फलक पाहताच डोक्यात भडका उठत असावा.
हेही वाचा - पाच मिनिटं उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना हाकलले शाळेच्या बाहेर, शिक्षण विभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष
मागील वर्षी वसमत येथे देखील असेच एका श्वानाला फलक लावून शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. मात्र, ते फलक काही वेळात हटवण्यात आले होते. आता कळमनुरीतील ज्युलीला दिलेल्या शुभेच्छांचा फलक किती वेळ झळकतो, कुणास ठावूक. तर, या फलकातून दुसरा कोणता संदेश तर द्यायचा नसेल ना? असेही तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र, काहीही असो प्राण्यांप्रति प्रेम असणाऱ्याची संख्या कमी नसल्याचेच या ज्युलीच्या वाढदिवसातून समोर आले आहे. तसेच कळमनुरी येथे अनेक पशुप्रेमी आहेत. यावेळी पशुपती हीच भावना प्रत्येकाच्या मनात राहणे गरजेचे असल्याचे या पशुप्रेमींनी सांगितले.
हेही वाचा - हिंगोलीतील 'त्या' मच्छिमाराचा मृत्यू विद्युत वितरणच्या हलगर्जीपणामुळेच