हिंगोली - एका चार चाकी वाहनातून घेऊन जाणाऱ्या गाय आणि कालवडीला जीवदान मिळाले आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील बोथी येथे घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टळला. जिल्ह्यात अधून मधून कत्तलीकडे गुरे नेण्याचे प्रमाण अजिबात कमी झालेले नाही. रशीद खान आबाद खान पठाण, युनूस कालू कुरेशी, (दोघेही रा.जवळा पांचाळ ता. कळमनुरी) असे आरोपींची नावे आहेत.
हे दोन्ही आरोपी एम. एच. 26 ए.डी. 5200 या क्रमांकाच्या मालवाहू वाहनात अतिशय क्रूर पद्धतीने गाय आणि एक कालवड घेऊन जात होते. त्यांना कळमनुरी तालुक्यातील बोथी येथे माळधावंडा रस्त्यावर काही तरुणांनी अडवले आणि वाहनातील गाय आणि कालवडीविषयी विचारणा केली. यावेळी दोघांनी त्या नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे तरुणांचा यांच्यावर संशय बळावला आणि त्यांनी बाळापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. बाळापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच दोघांसह वाहन ताब्यात घेतले.
हेही वाचा - प्रेयसीच्या घरात सापडल्याने प्रियकराला बेदम मारहाण; तरुणाचा मृत्यू
पोलीस जमादार रामेश्वर जगन्नाथ मिसाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेवरून अजूनही गोहत्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. पुढील तपास बीट जमादार जगन्नाथ मिसाळ करीत आहेत.