हिंगोली - जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले कोरोनाबाधित जवान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'आम्हाला कोरोना झाला आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला पण संसर्ग केल्याशिवाय सोडणार नाही. तसेच आम्ही असेच फिरणार; तुम्ही आमचे अजिबात काहीही बिघडवू शकणार नाही', असे बोलून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच बाधित जवान आयसोलेशन वार्डमध्ये न राहता रुग्णालयाच्या गच्चीवर फिरतानाचा व्हिडिओ व्हायरला झाला आहे. व्हिडिओ जवानांचा आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर शल्यचिकित्सकांनी राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशकांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
हिंगोली येथे दिवसेंदिवस कोरोनाबाधित जवानांचा आकडा वाढत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशल वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित जवानांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या नाकात दम आणला आहे. विशेष म्हणजे हे जवान ज्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत, ते आपल्या कक्षामध्ये न थांबता वार्डमध्ये रुग्णालयाच्या गच्चीवर फिरत आहेत. त्यांना कर्मचाऱ्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना हे बाधित जवान अतिशय खालच्या भाषेत बोलत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
आधीच जीव मुठीत घेऊन डॉक्टर, परिचारिका स्वतःची जराही पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. त्यातच हे जवान गच्चीवर फिरत आहेत. चिकित्सक किशोर श्रीवास यांनी तातडीने समादेशक मंचक इप्पर यांना लिखित पत्राद्वारे जवानांचा कारनामा कळविला आहे. सोबतच गच्चीवर जवान फिरतानाचा व्हायरल व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे.
कोरोनाची लागण झालेल्या परिचारिकेने देखील या जवानांची तक्रार केली आहे, तर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जवानांना ताकीद देत वर्तवणूक सुधारण्याच्या सूचना दिल्या आहेत. वर्तवणूक न सुधारल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, प्रचंड व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच रुग्णालय परिसरात वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.