हिंगोली - संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. सर्वजण कोरोनाच्या भीतीपोटी खूप सावधानता बाळगत आहेत. मात्र, कोरोना झाल्यानंतर अजिबात घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही, जर ''तुम्हारे मे हिंम्मत है तो किसींको भी हरा सकते है'' कोरोनातून मुक्त झालेल्या या रुग्णाने असा सर्वांना सल्ला दिला आहे, तर सामान्य रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
कोरोनाचे नाव जरी ऐकले तर अक्षरशः अंगावर शहारे उभे राहतात. त्यातच तो कोरोनाचा व्हायरस पाहिल्यानंतर थरकापच सुटायला लागतो. मात्र, ज्याची आपल्याला भयंकर अशी भीती आहे, अन् त्याची लागण होऊन त्यातून मुक्त झालेली व्यक्ती जर तुम्हाला धीर देण्याचा प्रयत्न करीत असेल तर यावर तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही. परंतु हे सत्य आहे.
एमएससीबीत गुत्तेदार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला महाभयंकर असलेल्या कोरोनाची लागण झाली. यावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. त्याला आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या स्वॅबचा अहवाल जेंव्हा पॉझिटिव्ह आला अन् याची जिल्ह्यात एकच चर्चा पसरली. तेव्हा सर्वांना घाबरगुंडी सुटली. मात्र ज्याला याची लागण झाली होती, त्याला याची पुसटशी कल्पनादेखील नव्हती. मग सुरू झाला त्या कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार करण्याचा प्रवास.
पहिलाच रुग्ण आला त्यामुळे सर्वांच्याच मनात भयंकर भीतीचे वादळ, प्रत्येकाच्या मनात भीती, विशेष करून परिचारिकाच्या, मात्र बॉसची ऑर्डर कोण टाळू शकेल, कोरोना वार्डची इंचार्ज म्हणून ज्योती पवार यांच्याकडे जबाबदारी सोपवली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार उपचार सुरू केले, तर डॉक्टरांच्यादेखील व्हिजिट मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. तर दुसरीकडे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने प्रशासन गतीमान झाले. रस्त्यावर सर्वांना बंदी घालण्यात आली होती. लागलीच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वाहन बंदीचे आदेशही काढले होते, एवढेच नव्हे तर ते स्वतः वाहने जप्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे या कोरोनाची अधिकच भीती वाढत होती. मात्र 14 दिवसाच्या उपचारांनंतर प्राप्त झालेल्या अहवालात त्या कोरोनाग्रस्त रुग्णांचे दोन्हीही अहवाल निगेटिव्ह आले.
उपचारानंतर रुग्णाला टाळ्यांच्या गजरात सुट्टी देण्यात आली. सुट्टीनंतर त्या रुग्णांला सर्वच डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात रुग्णवाहिकेपर्यंत निरोप दिला. रुग्णांनी सर्वांचे धन्यवाद मानत अजिबात घाबरून न जाण्याचा सल्ला दिला. एवढेच नव्हे तर अशा कठीण परिस्थितीत भोजन पुरवणाऱ्याचेदेखील त्या रुग्णाने आभार मानले. रुग्णाला निरोप देताना सर्वच कर्मचारी काही वेळासाठी भावुक झाल्याचे पाहावयास मिळाले.