हिंगोली - दाढी घरी करू शकतो, त्यावर कितीही बंदी घातली तर काही अडचण नाही. मात्र, डोक्याचे केस घरी कापता येणं हे अशक्यच आहे. त्यामुळे शेवटी सलूनमध्येच धाव घ्यावी लागली. आता सलून व्यवसायिकांनी कटींगचे दर वाढवले आहेत. परंतु, नाईलाज असल्याने व्यावसायिकाने जेवढे दर वाढवले तेवढे द्यावेच लागणार असल्याची खंत ग्राहकांनी व्यक्त केली.
तब्बल तीन महिन्यांनंतर सलूनची दुकाने उघडली आहेत. त्यामुळे व्यवसायीकांनी सरकारचे आभार तर मानलेच मात्र, ग्राहकांना सुविधा देखील देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सध्याच्या स्थितीत कटींगचे दर 100 रुपये केला आहे. सबंधित ग्राहकास स्वतंत्र कपडा दिला जाणार आहे, तो केवळ एकाच ग्राहकांसाठी असेल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 97 दिवसापासून बंद असलेली सलूनची दुकाने सरकारने नियमाचे बंधन घालून रविवारपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील सलून व्यवसायिकांनी रविवारपासून सलूनची दुकाने उघडली आहेत. राजू पवार यांनी पाच वर्षापूर्वी बँकेकडून लोन घेऊन सलूनचा व्यवसाय सुरू केला. मात्रया वर्षी अचानक या कोरोनामुळे संपूर्ण परिस्थिती बिघडून टाकली आहे. त्याचा प्रभाव रोखण्यासाठी सर्वच आस्थापने बंद ठेवली होती. त्यामध्ये सलून व्यवसाय देखील बंद ठेवण्याची वेळ ओढवली. सर्व काही याच व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक व्यवसायिकांसह कारागीरावर मात्र उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती. बँकेने हप्ते भरण्यासाठी अवधी दिला. त्यामुळे कुठे धीर मिळाला मात्र दैनंदिन जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे पवार यांनी सांगितले.
आता शासनाने नियमांचे पालन करुन सलूनची दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे धीर तर नक्की मिळेलच मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही नाभीक संघटनेच्या वतीने बैठक घेऊन शासनाच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात चर्चा करणार आहोत. म्हणजे नियम हे आम्हाला मान्यच राहणार आहेत. सरकारने जे काही नियम घालून दिलेले आहेत, त्या नियमांचे अजिबात उल्लंघन होणार नाही. मात्र, सरकारला देखील आम्ही विनंती करू शकतो की, कारागिरांना जर मालकांना वीस हजार रुपये मानधन दिले तर आमचा जीवन जगण्याचा प्रश्न सुटू शकतो, असे राजू पवार यांनी सांगितले.
कटिंग स्वतःला करता येत नाही, त्यामुळे सलूनमध्ये जाऊन कटिंग करावी लागते. कितीही दर वाढले तर चालतील, मात्र कोरोना कमी झाल्यानंतर दर कमी करायला पाहिजे असे एका ग्राहकाने सांगितले. ज्याप्रमाणे सलून व्यवसायिक अडचणीत आहेत, त्याचप्रमाणे आम्हीदेखील खूप अडचणींचा सामना करत असल्याचे एका ग्राहकाने सांगितले.