हिंगोली - सध्या विविध रुग्णालयांमध्ये रुग्णांची उपचारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र बऱ्याचशा रुग्णालयात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आव्हान करताच आव्हानाला प्रतिसाद देत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे रक्तदानासाठी अनेक रक्तदाते हे समोर आले आहेत. सोशल डिस्टन्सच्या सर्व नियमाचे पालन करत या ठिकाणी रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
संपूर्ण जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. आता हिंगोली जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने, प्रशासनासह सर्वसामान्य नागरिक चांगलेच भांबावून गेलेले आहेत. अशाच विदारक परिस्थितीमध्ये विविध रुग्णालयात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा खरोखरच न भरून निघण्यासारखा असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्वच रक्तदात्यांना रक्त दान करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सेनगाव येथे सामाजिक बांधिलकी जोपासत काही युवक हे रक्तदानासाठी सरसावले आहेत.
त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सोशल डिस्टन्सचे नियम पाळत रक्तदान केले आहे. सकाळपासून 40 ते 45 रक्तदात्यांनी याठिकाणी रक्तदान केले असून सायंकाळपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. विविध व्हाट्सअप फेसबुक ग्रुप वरून रक्तदान करण्यासंदर्भात आयोजकांनी आवाहन केले होते. त्यानुसार, आवर्जून रक्तदाते हे रक्तदान शिबिराच्या स्थळी धाव घेऊन रक्तदान करत होते.