हिंगोली - ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून आज मुख्यमंत्र्यांनी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील सरपंचाशी संवाद साधला. यासाठी प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील तीन तालुक्यातील ३४३ सरपंचाची मोबाईल क्रमांकासह यादी पाठविली होती. थेट १२ वाजता सवांदास सुरूवात झाली. प्रथम प्रधान सचिवांनी कॉन्फरन्सिंगमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची नावे सांगत, उद्देश सांगितला. कनेक्ट झालेल्या सरपंचानी केवळ टंचाईवर बोलायचे असल्याचे सांगितले. मख्यमंत्र्यांसोबत सवांद साधण्यासाठी मोबाईलवरून ० (शुन्य) दाबन्याच्या सूचना ही दिल्या. सवांद सुरू झाला पण समोरील सरपंचाचे बोलणे संपन्या अगोदरच बरेच सरपंच आपल्या मोबाईलवरुन ० दाबत होते. त्यामुळे अनेक सरपंच डिस्कनेक्ट झाल्याने सरपंचाचा हिरमोड झाला.
मुख्यमंत्री ऑडीओ ब्रिजद्वारे कनेक्ट झाल्यानंतर त्यांनी सरपंचाच्या अडीअडचणी ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्या- त्या गावातील प्रश्न सोडवण्याचे निर्देश दिले. कनेक्ट झालेले सरपंच आपल्या गावातील समस्या सांगत होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी समस्या नोंद करून त्याकडे लक्ष घालण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सरपंचांनी मागणी केल्याप्रमाणे पाण्याच्या बाबतीतील सर्वच प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत. पाणी प्रश्न निवारणासाठी प्रशासनाने लक्ष घालावे, त्याच बरोबर ग्रामस्थांना आपल्याच गावांमध्ये रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्र्यांनी जवळपास तीन तालुक्यातील पंधरा-पंधरा सरपंचाशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांसोबत आपला संवाद होणार असल्याने अनेक सरपंच सकाळपासूनच हातात मोबाईल घेऊन बसले होते. आपल्या मोबाईलवर येणाऱ्या प्रत्येक कॉल वर लक्ष ठेऊन होते. याच वेळेत दुसऱ्या कोणाचा कॉल आला तर नंतर फोन करण्यास सांगत होते. नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ६० च्यावर सरपंच, ग्रामसेवकांशी मुख्यमंत्र्यांनी सवांद साधला. सवांदा दरम्यान, गावात पाण्याची टाकी बांधणे, पाणीपुरवठा योजनेची अर्धवट कामे पूर्ण करून सिंचन विहिरी आणि हातपंपाची दुरुस्ती करावी, टँकरच्या फेऱ्या सुरू असलेल्या गावात पाणी कमी पडत असेल तर फेऱ्या वाढवण्याची मागणी अनेक गावातील सरपंचांनी केली. त्या त्या गावातील सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
हिंगोली जिल्ह्यातील या गावातील सरपंचाचा झाला मुख्यमंत्र्यांसोबत संवाद -
खंडाळा, घोटा देवी, केसापूर, कडती, चोरजवळा, हिवरा बेल, पिंपळखुटा, लींगदरी, अजेगाव, भंडारी, ब्रह्मवाडी, दाताडा, दाताडा बु, धानोरा, जांभरुन बुद्रुक, कापडसिंगी, केंद्रा बु. तोंडापूर, पोतरा, कोंढुर झुंझुनवाडी या गावातील सरपंचा सोबत सवांद साधला. सर्व सरपंचांसोबत संवाद साधल्यानंतर जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत चार ते पाच मिनिट मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्दशाचे हिंगोली प्रशासन कितपत पालन करून, पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, अपर जिल्हाधिकारी जगदीश मणियार, आरडीसी सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर एच.पी. तूमोड, मुख्याधिकारी रामदास पाटील, जिल्हा आरोग्यधिकारी शिवाजी पवार, शल्यचिकित्सक किशोर श्रीवास आदीं अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.