हिंगोली - जिल्ह्यातील वसमत येथील शिकलकरी समाजाचे वऱ्हाड नवरीसह वाशिममार्गे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे जात होते. माळहीवरा फाट्यावरील एका धाब्यावर वर्हाड चहा-पाण्यासाठी थांबले होते. यावेळी तेथे असलेल्या एका दारूड्याने वऱहाडातील एका महिलेचा हात धरल्याने तसेच वऱ्हाडातील एकाला रॉड मारल्याने याठिकाणी चांगलाच राडा झाला. ही घटना शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. या घटनेत वऱ्हाडी मंडळीकडील चौघे तर धाबा चालकासह तिघे असे एकूण सातजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही.
वसमत येथील शिकलकरी समाजातील एका तरुणीचा विवाह अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील भीमसिंग कन्हैया सिंग बावरी यांच्या सोबत आज सकाळी १० वाजता विवाह होणार होता. वाशीमकडे रवाना होत असताना वऱ्हाड येथे चहा पाणी घेण्यासाठी थांबले. यावेळी हा प्रकार घडला आहे. वऱ्हाडी मंडळीची ढाबा चालकासह ढाब्यावर दारू पिणाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. एवढेच नव्हे तर वऱ्हाडी मंडळीतील महिलांची छेड देखील काढली. यामध्ये वऱ्हाडी मंडळीतील हरजित कोर, रत्नसिंग चव्हाण, गुरू चरणसिंग चव्हाण, हरजितसिंग कन्हैया सिंग टाक हे चौघे जण जखमी झाले आहेत. यातील तिघांवर वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवरी सोबत असल्याने वऱ्हाडी मंडळी चिंतातूर
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे बिट जमादार नंदकुमार मस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. तो पर्यंत वऱ्हाडाचा टेंपो वाशीमपर्यंत गेला होता. मस्के यांनी वाशीम येथील पोलिसांशी संपर्क साधला असता तेथील पोलिसांनी नाका बंदी केली अन् तेथून टेम्पो थेट हिंगोली ग्रामीणला आणला. रात्रीपासून वऱहाडी मंडळीला पोलिसांनी ताटकळत ठेवले. एवढेच नव्हे तर काहींना मारहाण केल्याचेही वऱ्हाडी मंडळी सांगत होती. त्यामुळे पोलिसांच्या कार्याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. आज सकाळी वऱ्हाडी मंडळीतील तिघांना ताब्यात घेतले अन् वऱहाडाला वाशीमकडे रवाना केले आहे. विशेष म्हणजे वाहनासोबत नवरीही असल्याने वऱ्हाडी मंडळी चांगलीच चिंतातूर झाली होती.
ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अगद सुडके यांना घटने संदर्भात विचारणा केली असता, त्यांनी या घटनेबाबात काहीही माहिती नसल्याचे सांगत बोलण्यास स्पष्ट नकार दिला. माळहीवरा येथील ढाब्यावर नेहमीच अवैध दारूविक्रीसह पेट्रोल विक्री होते. मात्र, पोलीस त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत, हे विशेष. अशातच ही घटना घडल्याने आता पोलीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.