हिंगोली - सत्तेवर येताच प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघातील एक अविकसित गाव दत्तक घेण्याचे महत्त्वकांक्षी काम सुरू केले. त्या अनुषंगाने राज्यभरातील विधानसभा व विधनपरिषद सदस्यांनी स्वत:च्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेतले. राज्यभरातून अशा दत्तक घेतलेल्या गावांचा खरचं विकास झाला आहे का, यासाठी 'ईटीव्ही भारत'ने या गावांना भेट देऊन स्थानिकांशी चर्चा केली.
हिंगोली विधानसभा मतदारसंघातील आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सेनगाव तालुक्यातील कडोळी हे गाव दत्तक घेतले. या दत्तक गावाचा मागील तीन वर्षांतील विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर या गावाचे आमदाराकडून पालन झाले; पण पोषण झाले नसल्याचे समोर आले आहे.
आमदार मुटकुळे यांनी दत्तक घेतलेले कडोळी हे गाव भारतरत्न नानाजी देशमुख यांचे जन्म गाव आहे. तसेच नानाजी देशमुख यांच्या नावाने सरकारने कृषी संजीवनी योजना राबवण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनीही या गावाला भेट दिल्याने येथील ग्रामस्थांना खरोखरच आपल्या गावाचे नंदनवन होण्याच्या अपेक्षा होत्या. गाव दत्तक घेतल्यानंतर ज्याप्रमाणे विकास करण्याची आश्वासने देण्यात आली, त्या तुलनेत आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
कोणत्याही गावाचा विकास त्या ठिकाणच्या मानव विकास निर्देशांक वाढण्यावर अवलंबून असतो. यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि उपजीविका या मूलभूत घटकांचा प्रामुख्याने विचार करण्यात येतो. गावातील अंगणवाडी व शाळेच इमारत मोडकळीस आली असून, पाच वर्षांच्या कालावधीत डागडुजी देखील झाली नाही. गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बंद स्थितीत असून, त्याची पडझड होत आहे. अनेक दिवसांपासून गावातील पाईप लाईनचा प्रश्न प्रलंबित असल्याने डासांचे प्रमाण वाढले असून, आजाराचा प्रसार होत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी गावकऱ्यांनी एमबीबीएस डॉक्टरची मागणी केली आहे. सद्यस्थितीत गावातील रुग्णांना थेट वाशिम, गोरेगाव, हिंगोली या ठिकाणी उपचारासाठी जाण्याची वेळ आली आहे.
स्वच्छ भारत योजनेअंतर्गत कडोळी येथील घरांपुढे शौचालयांची बांधकामे पूर्ण झाली आहेत. तसेच मुख्य मार्गावरील गावातून सिमेंट रस्त्याचे ही बांधकाम झाले. ही दत्तक गावाच्या जमेची बाजू सोडल्यास गल्ली-बोळातून वाहणारे सांडपाणी, रस्त्यावर जमा होणारा चिखल यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत.
संबंधित गावात संत तुकाराम महाराजांचे देवस्थान असल्याने या गावात दर पंधरा दिवसांनी दिंडी काढण्यात येते. मात्र, रस्त्यावरील अर्धवट बांधकामांमुळे वयोवृद्ध भाविकांना खड्यांचा त्रास सोसावा लागतो.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरील बाजूस असलेल्या विजेच्या खांबाजवळ अनधिकृत आकडे टाकून वीजेची पर्यायी व्यवस्था केल्याचे चित्र आहे. या गावांमध्ये सार्वजनिक पाणीपुरवठ्याची योजना कार्यान्वित नसल्याचे वाहनातून टाकीच्या साहाय्याने भरून आणलेल्या पाण्यामुळे कळून चुकले. तसेच गावच्या मध्यभागी असलेल्या पाण्याच्या टाकीची जोडणी तीन महिन्यांपासून बंद असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्वराज्य योजनेच्या विहिरीवर आजपर्यंत 33 लाख रुपये खर्च झाले आहेत. परंतु, ग्रामस्थांना अद्याप पाणी मिळाले नसून, याच विहिरीवर पुन्हा 3 लाख रुपये खर्च करून पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
ग्रामीण विकासासाठी योगदान दिलेल्या नानाजी देशमुख यांची संपूर्ण देशात ओळख आहे. त्यांच्याच नावाने गावात सुरू असलेल्या न्याय सरस्वती विद्या मंदिर संस्कार केंद्र व वाचनालय चालवले जाते. मात्र याचाही कायापालट होऊ शकलेला नाही. तसेच आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी भेट दिली, पण काहीच उपयोग झाला नसल्याची खंत येथील शिक्षकांनी व्यक्त केली.
आमदार मुटकुळे यांनी भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या मोडकळीस आलेल्या घराचा स्वखर्चातून जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी मतदारसंघात गाव तिथे सभागृह उभारले आहे. मात्र शाळेसाठी देऊ केलेल्या 1 लाख रुपयांचे आश्वासन मुटकुळे पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे शाळेतील शिक्षक या आश्वासनाच्या पूर्ततेची वाट पाहात आहेत. अंगणवाडीचा कायापालट करण्यात आमदारांना अपयश आले आहे. या इमारतीत चढण्यासाठी पायऱ्या देखील नसून, ठिकाणी पाण्याचा बोअर आहे.
गावाचे नंदनवन करण्यात आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. परंतु त्यानी दत्तक गावावर बोलण्यास स्पष्ट नकार देत मतदारसंघात विकास करण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असल्याचे ते म्हणाले.