हिंगोली - शाळा, महाविद्यालये तसेच खासगी शिकवणीसाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या रोडरोमियोंवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक शाखेतर्फे एकूण 60 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 16 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. तसेच 25 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून रोडरोमिओ महाविद्यालये आणि खासगी शिकवणी परिसरात दुचाकी वाहने उभी करत होते. यानंतर विद्यार्थिंनीची छेड काढणे, विद्यार्थिंनीचा पाठलाग करणे याबद्दलच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. यामुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शाळा, महाविद्यालये परिसरात जाऊन रोडरोमियोविरोधात मोहीम सुरू केली. यामध्ये माणिक स्मारक शाळा, आदर्श विद्यालय आदी ठिकाणी विनानंबर तसेच रायडर, बॉस, किंग, दादा, हम है दम है अशा नंबर प्लेट्स असलेल्या 25 वाहने जप्त करण्यात आली आहेत. यावेळी 18 वर्षे वयापेक्षा कमी वय असलेली मुले वाहन चालवत असल्याचेही आढळून आले. यानंतर या मुलांची वाहने जप्त करण्यात आली आणि त्यांच्या पालकांना बोलावून घेत बालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - पाथरी जन्मस्थान तर शिर्डीला साईंची समाधी - प्रताप पाटील-चिखलीकर
या कारवाईने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर पुढेही ही मोहीम सलग सुरू राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे सपोनि ओमकांत चिंचोळकर यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पालकांना केले आवाहन -
अनेकदा आवाहन करूनही अल्पवयीन मुले दुचाकी चालविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे आता संबंधित दुचाकी ताब्यात घेत त्या दुचाकीस्वारांचा पालकांना बोलावून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सपोनि ओमकांत चिंचोळकर यांनी सांगितले आहे.