हिंगोली- नागनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला भवानीदेवी माळाजवळ ट्रकने पाठीमागून धडक दिली. यामध्ये दोनही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोघेही पूर्णा तालुक्यातील धार-वाई गावचे रहिवासी आहेत.
वामन सुर्वे (35), चांदजी पवार (38 ) अशी अपघातग्रस्तांची नावे असून, ते आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे पहिल्या श्रावणी सोमवारी देवदर्शनासाठी गेले होते. दर्शनावरून परतताना शिरड-शहापूर जवळील भवानी देवी माळाजवळ औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातानंतर डोक्यातून अतिरक्तस्राव झाल्याने दुचाकीस्वारांनी जागीच दम तोडला.
घटनेची माहिती मिळाल्यावर कुरुंदा पोलीस ठाण्याचे फौजदार व्ही.जी. नेटके, जमादार नेव्हल पाटील, यांनी घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला. यानंतर मृतदेह वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत.
पहिल्याच श्रावण सोमवारी भविकांवर काळाचा घाला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.