हिंगोली: जिल्ह्यात काही दिवसांपासून अपघाताची मालिका (A series of accidents) सुरूच आहे. तीन दिवसात झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. वाढत्या अपघाताच्या संख्येमुळे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. सेनगाव ते रिसोड मार्गावरील रिधोरा फाट्याजवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील सर्वच रस्ते नव्याने बनवण्यात आले आहेत, त्यामुळे रस्त्यावर वाहनांचा वेग वाढला आहे. गुळगुळीत रस्त्यामुळे वाहन चालकांचा वाहनवरील ताबा सूटून अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
22 मे रोजी सेनगाव तालुक्यातील रिधोरा फाट्या जवळ झालेल्या अपघातात एकाचा डीजे चे वाहन अंगावर पडून मृत्यू झाला. जेसीबीच्या साह्याने वाहन उचलून मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर 20 मे रोजी कडती फाट्याजवळ झालेल्या टेम्पो आणि कार अपघातात मनोज देसाई यांचा तर वसमत तालुक्यातील बाराशिव सहकारी साखर कारखाना परिसरात झालेल्या ट्रॅक्टर अन दुचाकी अपघात ज्ञानेश्वर मारोती मोकाटे (40) विश्वनाथ परसराम माघाडे (35) रा. नागेश्वरवाडी यांचा मृत्यू झाला, तर कळमनुरी तालुक्यातील कांडली येथे झालेल्या दुचाकी अपघातात सतिष उर्फ बाळू भगवानराव नरवाडे (24) यांचा मृत्यू झाला. सेनगाव तालुक्यातील ब्रह्मपुरी पाटीजवळ झालेल्या कार आणि आटोच्या धडकेत अंकुश साहेबराव साबळे, अंकिता साहेबराव साबळे या पती पत्नीचा मृत्यू झाला.
वाढत्या अपघाताच्या मालिकेमुळे सर्वच वाहन चालक गोंधळून गेले आहेत. याहून गंभीर बाब म्हणजे उपप्रादेशिक परिवहन व पोलीस विभाग चिंताग्रस्त झाला आहे. एक घटना संपत नाही तर दुसरी घटना घडल्याचे समोर येत आहे. तीन दिवसात सात जणांचा मृत्यू झाल्याने, अपघाताच्या भिती मुळे वाहनचालकांना या रस्त्यांवर वाहन चालविताना काळजी घेण्यासोबतच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे वाहन चालक सांगत आहेत.
जिल्ह्यांतील अपघातांच्या घटनांमुळे वाहनचालक प्रवासी प्रशासन पोलीस असे सगळेचजन हैराण झाले आहेत. वाढत्या अपघाताच्या मालिकेला आवर घालण्यासाठी पोलीस व उपप्रादेशिक विभाग काय उपाययोजना राबविणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या दोन्ही विभागाने अपघात टाळण्यासाठी काहीतरी उपाय योजना राबविल्यास अपघाताच्या घटना काही प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.