हिंगोली- परभणी येथील कोविड वॉर्डमधून पळ काढून आपल्या पारडा या गावी येण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारास बासंबा पोलिसांच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी २४ तासात गुन्हेगारास बेड्या ठोकून परभणी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मुलीची भेट घेऊन लांब पलायन करण्याचा आरोपीचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रयत्न फसला.
विकास गोविंदपुरे असे आरोपीच नाव आहे. तो व बाळू तोरकड, विकास तोरकड या तिघांनी मिळून पारडा शिवारात ७ महिन्यापूर्वी जादूटोणा करण्याच्या कारणावरून शंकर घेणे या व्यक्तीचा खून केला होता. याप्रकरणी या तिघांवर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून हे तिघेजण परभणीच्या कारागृहात शिक्षा भोगत होते. दरम्यान, विकास गोविंदपुरे याला कोरोनाची लागण झाली, त्यामुळे त्याला परभणी येथील कोरोना वॉर्डमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. मात्र, आरोपी व इतर तिघे जण वॉर्डमधील बाथरूम मधल्या खिडकीतून बेडशीटच्या साहायाने पळून गेले. त्यापैकी विकास गोविंदपुरे हा पारडा येथे आला होता.
ही बाब परभणी पोलिसांनी बासंबा पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपाधीक्षक रामेश्वर बैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली बासंबा पोलीस ठाण्याचे स.पो.नि राजेश मल्लपिलू, स.पो.उप.नी मगन पवार यांच्या पथकाने आरोपी विकास गोविंदपुरे याला पारडा शिवारातील एका शेतातून अटक केली. प्रथम त्याला मास्क घालायला दिले, नंतर त्याला सामाजिक अंतर पाळत सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन परभणी पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे स.पो.नि मल्लपिलू यांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मला माझ्या मुलीला एकदा शेवटचे बघायची इच्छा होती, त्यामुळे मी माझ्या गावी आल्याचे गोविंदपुरे याने सांगितले.
हेही वाचा- चप्पल-बूटांच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; हट्टा पोलिसांनी केला पर्दाफाश