हिंगोली - जिल्ह्यामध्ये आता कोरोनाचा सामूहिक संसर्ग वाढत आहे. त्यामुळे प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. साखळी थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 6 ते 19 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेमध्ये केली. त्यामुळे पुन्हा हिंगोली जिल्ह्यात जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, या बंद दरम्यान, अत्यावश्यक आस्थापणे, शासकीय कार्यालय अन बँका सुरू राहणार असल्याचे जयवंशी यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या ही सातशेच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोनाची साखळी वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता हिंगोलीचे प्रशासन सतर्क झाले असून, ही साखळी थांबविण्यासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घेतला आहे.
प्रशासनाच्यावतीने कोरोनापासून बचावासाठी जी काही जनजागृती करण्यात येत होती, त्याकडे नागरिक साफ दुर्लक्ष करत होते. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. बंद काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी जे काही भाजी विक्रेते किंवा फुटकळ व्यापारी असतील त्यांची अँटिजेन टेस्ट केली जाणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर ज्या व्यापाऱ्यांनी ही टेस्ट केलेली असेल त्यांनाच व्यापार करता येणार असल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले.
या तपासण्या करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, त्याच्या तारखाही जाहीर केल्या जातील. नागरिकांना त्यांची राहिलेली कामे तसेच आवश्यक त्या बाबी घेता याव्यात म्हणूनच दोन दिवस अगोदर या संचारबंदीची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो या दोन दिवसांमध्ये आपली सर्व कामे पूर्ण करावीत तसेच आवश्यक अशा गरजेच्या लागणाऱ्या वस्तू खरेदी कराव्यात असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.