हिंगोली- जिल्ह्यात एक कोरोनाग्रस्त आढळलेला होता. काही दिवसांपूर्वी हा रुग्ण बरा झाल्यानंतर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण राहिला नव्हता. त्यामुळे, हिंगोली जिल्हा हा कोरोनामुक्त ठरवत ग्रीन झोनमध्ये असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता अचानक सहा जवानांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे, हिंगोलीकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे. पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथील राज्य राखीव बल गट क्रमांक 12 मधील सी आणि डी ह्या तुकड्या मुंबई आणि मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेल्या होत्या. हिंगोली येथे या तुकड्या दाखल होताच समादेश मंचक ईप्पर आणि खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच जवानांना कॅम्पमध्येच अलगिकरण कक्षात ठेवले. एकाही अधिकारी तसेच जवानाला कोणाच्याही संपर्कात येऊ दिले नव्हते. सामान्य रुग्णालयाच्यावतीने जवानांचे घेतलेले नमुने हे औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाले असता, यात सहा जवानांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला.
यात मुंबई आणि मालेगाव येथे गेलेल्या दोन्ही टीममधील जवानांचा समावेश आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालामुळे हिंगोलीकरांचा ग्रीन झोनचा आनंद मात्र औट घटकेचा ठरला आहे. त्यातच मंत्रालयात नोकरी करत असलेल्या एका जणाचा अचानक मृत्यू झाल्यामुळे आणि सहा जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.