हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. एकाच दिवशी 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या दुसऱ्या दिवशी परत सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 5 जवानांचा तर एक सेनगाव येथील गृह विलगीकरण केलेल्या व्यक्तीचा समावेश आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. एकूण रुगसंख्या 52 वर पोहोचली आहे. वाढत्या संख्येने हिंगोलीकरांची मात्र धाकधूक वाढत आहे.
हिंगोली जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या आरोग्य विभागाच्या अहवालात आज 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने हिंगोलीकरांच्या चिंतेत वाढ होत आहे. आजपर्यंतचा आकडा 52 वर पोहोचला असून अजून 471 जणांचे अहवाल हे येणे बाकी आहेत, तर कोरोना संशयित रुग्णांचीदेखील आकडेवारी चिंतेत पाडणारी आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे राज्य राखीव दलातील आहेत. हिंगोलीच्या एका रुग्णावर औरंगाबाद तर दुसऱ्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातच प्रलंबित अहवालातून परत कोरोनाबाधित रुग्ण वाढतात की काय? ही भीती हिंगोलीकराना चांगलीच सतावत आहे.
विशेष म्हणजे समुपदेशकांच्या हलगर्जीपणामुळे राज्य राखीव दलातील रुग्ण संख्येत वाढ होत चालली असल्याचा आरोप विराट राष्ट्रीय लोकमंचचे अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी केला आहे. त्यामुळे शेख यांनी शासनाकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. हॉटस्पॉट असलेल्या मुंबई अन मालेगाव येथून बंदोबस्त आटोपून हिंगोलीत परतलेल्या जवानांना आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्व अन सूचनेनुसार न ठेवल्यानेच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच बरोबर सेनगाव, हिंगोली, ओंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी या ठिकाणी असलेल्या शासकीय विलगीकरण केंद्रांमध्ये असलेले कोरोना संशयित रुग्णांना मोठ्या असुविधेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत, याठिकाणी लहान मुले असल्याने त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेख नाईम यांनी केली आहे.