हिंगोली - लग्नासाठी टाकण्यात आलेला मंडप वावटळीने उडाल्याने मंडपाचे रॉड अंगावर पडून ४ वऱ्हाडी जखमी झाले. ही घटना नांदगाव तांडा येथे रविवारी दुपारी घडली. लग्नाला अवघा काही क्षण बाकी असताना घडलेल्या या घटनेने वऱ्हाडी मंडळींची चांगलीच धावपळ उडाली.
नांदगाव तांडा येथील लक्ष्मण जाधव यांच्या छाया नावाच्या मुलीचा रुपुर तांडा येथील विठ्ठल राठोड यांचा मुलगा राजू राठोड सोबत विवाह समारंभ पार पडत होता. लग्न घडी अवघ्या काही वेळावर येऊन ठेपली होती. लग्न लावण्याची तयारीही जोरात सुरू होती. विवाह लवकर आटोपून घेण्यासाठी सर्वच घाई करत होते. लग्नाची घाई सुरू असताना अचानक आलेल्या वादळी पावसामुळे मंडप पूर्ण वर उचलला गेला. त्यामुळे काही लोखंडी रॉड वऱ्हाडी मंडळीच्या मधोमध पडले. यामध्ये बरेच जण जखमीही झाले तर काहींनी प्रसंगावधान राखत मंडपाबाहेर धाव घेतली. मात्र, महिलांना मंडप अंगावर पडल्यामुळे जागचे हलता आले नाही. संपूर्ण मंडप उडून गेल्यामुळे लग्नविधीसाठी नव्याने मंडप तयार करावा लागला.
मागील काही दिवसापासून शहरी तसेच ग्रामीण भागात लग्नसराईची मोठी धूम सुरू आहे. लग्नाला येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीचा अंदाज घेत, मोकळ्या जागेत मंडप घालण्यासाठी वधूकडील मंडळीची घाई असते. मात्र, तीन ते चार दिवसांपासून अचानक वावटळीचे प्रमाण वाढल्यामुळे, लग्न मंडप उडून जाण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. अशीच घटना दोन दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील बळसोंड येथील लग्नप्रसंगी घडली. या लग्न मंडपाच्या ठिकाणी तर ३३ के. व्ही. विद्युत पुरवठ्याच्या तारा जात होत्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरीही मंडपाचे मोठे नुकसान झाले आहे.