हिंगोली - राज्य राखीव दलाच्या आणखी चार जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. हे चारही जवान कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ११ झाली आहे.
हिंगोली राज्य राखीव दलाची तुकडी मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेली होती. मालेगाववरून परतल्यानंतर खबरादारी म्हणून सर्वांना क्वारंनटाईन केले होते. त्यापैकी सुरुवातील ६ जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आणखी एका जवानाला कोरोनाची लागण झाली, तो जालना राज्य राखीव दलामध्ये कार्यरत आहे. तसेच आज पॉझिटिव्ह आढळलेल्या ४ जवानांपैकी ३ जवानांना कोरोनाची लक्षण दिसत असल्यामुळे त्यांना आयसोलेशन कक्षामध्ये दाखल करण्यात आले होते, तर एका जवानाला २४ एप्रिलला दाखल केले होते. सर्वांचे स्वॅब घेऊन औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला होता. आज त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून चारही जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी एका जवानाला कोरोनाची लागण -
हिंगोली येथील हिवरा बेल येथील जवान जालना येथील राज्य राखीव दलात कार्यरत आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मालेगावला हिंगोलीसह जालना राज्य राखीव दलाची देखील तुकडी बंदोबस्तासाठी गेली होती. हिंगोली येथील तुकडी बंदोबस्त आटोपून परत येत असताना, सुट्टी मिळालेला जालना येथील जवान हा हिंगोली येथील वाहनांमध्ये बसून जालन्यापर्यंत आला. जालन्यामध्ये उतरून त्याच्या खोलीवर गेला. तो दुसऱ्या दिवशी २० एप्रिलला दुचाकीने हिंगोली जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचला. याची माहिती हिंगोलीतील राज्य राखीव दलाला मिळताच त्याला तपासणीसाठी बोलवण्यात आले. त्याची २३ एप्रिलला तपासणी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी २४ एप्रिलला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनाने तातडीने त्याला कोरोना कक्षामध्ये दाखल केले. तसेच या जवानाचे गाव देखील सील करण्यात आले आहे.