हिंगोली - शासकीय कार्यालयात कागदाचे गठ्ठे पडलेले आपण अनेक वेळा पाहिले असेल. मात्र, हिंगोलीतील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात वीसपेक्षा जास्त जुन्या दुचाकी पडून असल्याचे आढळून आले आहे. यामुळे जिल्हापरिषद परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही बाब वाहतूक शाखेला कळतात वाहतूक शाखेच्या पथकाने धाव घेऊन चौकशी केली. या दुचाकी एका योजनेतील असल्याचे समोर आले. आता या दुचाकी चर्चेचा विषय बनल्या आहेत. हिंगोली जिल्हा परिषद ही नेहमीच विविध बाबींमुळे चर्चेत असते. पूर्वीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालय सध्याचे माध्यमिक शिक्षण कार्यालयात जुन्या अर्धवट वापरलेल्या 20 पेक्षा अधिक दुचाकी धूळ खात पडलेल्या आढळून आल्या. त्यामुळे जिल्हा परिषद परिसरात जोरदार चर्चा रंगत आहे. या दुचाकीचे काही महत्त्वाचे पार्टही गायब झाले आहेत. अचानक एवढ्या मोठ्या दुचाकी एका कार्यालयात ठेवल्याची गोपनीय माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांना मिळाली. त्यांनी ताबडतोब जिल्हा परिषदेच्या कार्यालयात वाहतूक शाखेचे कर्मचारी चौकशीसाठी पाठविले.
हेही वाचा - हिंगोलीत मुस्लिम बांधव सीएए विरुद्ध आक्रमक; अंगावर तिरंगा काढून सरकारविरुद्ध घोषणाबाजी
दुचाकींची चौकशी केली असता जनसमृद्धी बायफ या संस्थेमार्फत राबविलेल्या विशेष प्रकल्प सुवर्णजयंती ग्रामरोजगार योजनेअंतर्गत दुचाकींसह विविध साहित्य देण्यात आले होते. ते साहित्य त्या संस्थेकडून जिल्हा ग्रामीण यंत्रणेने परत घेतले आहेत. यामध्ये दुचाकी, टेबल, खुर्ची, रॅक, कपाट, संगणक इत्यादी साहित्यांचा समावेश आहे. तसेच याचा नियमानुसार लिलाव करण्यात येणार असल्याचे पत्र ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाकडून वाहतूक शाखेला देण्यात आले आहे. त्यामुळे आता या साहित्यांसह दुचाकींच्या होणाऱ्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - 'सीएए' कायद्याविरोधात हिंगोलीतील मुस्लीम महिला एकवटल्या