हिंगोली: कन्याकुमारी कृष्णाराव भोसले (19), रा. आंबा चोंढी असे मयत झालेल्या तरुणीच नाव आहे. कन्याकुमारी गेल्या काही दिवसापासून पोलीस भरतीचा सराव करत होती. नेहमीप्रमाणे ती आपल्या मैत्रिणीसह चोंढी फाटा ते औंढा नागनाथ महामार्गावर धावण्याचा सराव करत होती. कन्याकुमारीच्या मैत्रिणी धावत - धावत पुढे गेल्या तर कन्याकुमारी देखील मैत्रिणीच्या पाठीमागे धावत धावत येत होती. त्याच क्षणी पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून येणाऱ्या भरदाव कारने कन्याकुमारीला जोराची धडक दिली. यामध्ये कन्याकुमारी रस्त्यावर कोसळली आणि कार भर वेगाने निघून गेली. कार पुढे गेल्यानंतर दोन्ही मैत्रिणीने मागे वळून पाहिले तर कन्याकुमारी रस्त्यावर पडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली. मैत्रिणीनी लागलीच कन्याकुमारी जवळ धाव घेतली आणि घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली.
कारचालकाचे पलायन: हा अपघात एवढा भयंकर होता की, अपघात झाल्यानंतर कन्याकुमारी दहा ते बारा फूट वर उडाली अन वरून खाली पडली. अपघात होताच कारचालकाने कार थांबवून कन्याकुमारी जवळ धाव घेतली. मात्र कन्याकुमारीचा मृत्यू झाल्याचे, लक्षात येताच कार चालकाने घटनास्थळावरून कारसह पळ काढला. हा संपूर्ण प्रकार परिसरात असलेल्या शेतातील आखाड्यावरील शेतकऱ्यांनी पाहिला.
आणि ती जोरदार ओरडली : अपघात होता क्षणी कन्याकुमारी जोरात ओरडली होती. त्यामुळे पुढे गेलेल्या दोन मैत्रिणीने मागे वळून पाहिले तर कन्याकुमारी ही रस्त्यावर रक्ताच्या तिरोळ्यात पडलेली दिसून आली. घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली घटनेची माहिती कुरुंदा पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, जमादार बालाजी जोगदंड, विनायक जानकर, ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह वसमत येथील उपजिल्हा रुळेत हलविला आहे. उराशी स्वप्न बाळगून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या कन्याकुमारीचे पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ट्रकखाली चिरडून मृत्यू: अशीच एक आणखी घटना घडली आहे. मुंबई-नाशिक द्रुतगती महामार्गावरून दोघे मित्र दुचाकीवरून भिवंडीहून मुंबईच्या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली असता, झालेल्या अपघातात दोघांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना महामार्गावरील खारेगाव ब्रिजलगतच्या बॉम्बे ढाब्यासमोर घडली आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात भीषण अपघाताच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सूरज सुनिल कुंचिकोरवे (२६), मुत्तू लक्ष्मण मुरघन तेवर (२६ दोघे रा.धारावी, मुंबई) अशी अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या मित्रांची नावे आहेत.