गोंदिया - शहरात सकाळच्या सुमारास किरकोळ वादातून मित्राची भरदिवसा गोळी झाडून हत्त्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल बोरकर, असे मृत तरुणाचे नाव असून आकाश मेश्राम, असे आरोपीचे नाव आहे.
मृत राहुल बोरकर आणि आरोपी आकाश मेश्राम हे दोघे मित्र असून आरोपी मेश्राम याची गोंदिया शहरच्या भीम नगर परिसरात चहाची टपरी आहे. मृत राहुलने ११ एप्रिलला आकाशच्या चहा टपरीमध्ये जाऊन तोडफोड केली होती. याचाच राग आकाशने मनात ठेवला होता. सकाळी दोघांनी ८ वाजण्याच्या सुमारास नाश्ता केला. यावेळी पुन्हा दोघांच्यात वाद झाला. याचवेळी आकाशने राहुलच्या छातीच्या उजव्या बाजूला देशी कट्ट्याने गोळ्या झाडून त्याची भरदिवसा हत्या केली. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासचक्रे फिरवत आरोपी आकाश मेश्रामच्या काही तासातच अटक करत त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.
विशेष बाब म्हणजे सध्या निवडणुकांची आचार संहिता लागू असताना शहरातील आरोपीने देशी कट्टा आपल्या जवळ हाताळला कसा? असा प्रशन पोलिसांनी आरोपीला विचारला. त्यावर मध्यप्रदेशमधील नरसीमपूर जिल्ह्यतील लखनदोरा गावातून देशी कट्टा आणल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. मात्र, हा देशी कट्टा आरोपीने तीन वर्षांपूर्वीच आणलेला आहे, असेही आरोपीने म्हटले आहे.