गोंदिया - महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून पोलीस विभागातर्फे महिलांच्या सुरक्षेसाठी 'स्त्री - स्कॉड'ची स्थापना केली आहे. त्यामुळे आता चैन स्नॅचिंग, मुलींची छेडछाड, अशा घटनांवर आळा बसनार आहे. विशेष म्हणजे या स्कॉडच्या वर्दीचा गणवेशही वेगळा ठेवण्यात आला आहे. महिलांना पोलीसाच्या खाकी वर्दीची भीती वाटू नये, म्हणून नेव्ही ब्ल्यू रंगाचा गणवेश तयार करण्यात आला आहे.
गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्त्री-स्कॉड तयार केला आहे. या पथकात १५ महिला कर्माचारी आणि १ सहाय्यक महिला पोलीस निरीक्षकाचा समावेश राहणार आहे. त्यामुळे एखाद्या मुलीने किवा कोणत्याही व्यक्तीने पोलीस विभागातर्फे देण्यात आलेल्या व्हाट्स अॅप नंबर किवा संकेत स्थळावर तक्रार केल्यास त्यांच्यापर्यंत हे स्त्री-स्कॉड पोहचणार आहे. याशिवाय महिलांमध्ये जनजागृतीदेखील करण्यात येणार आहे.
या स्त्री-स्कॉडच्या माध्यमातून महिलांच्या मदतीसाठी विविध संकेत स्थळे, व्हॉट्स अॅप नंबर, पोलीस हेल्प लाईन नंबर इत्यांदीची माहीती देण्यात येणार आहे. सोबतच ज्या घरी हे स्त्री स्कॉड जाईल त्या घराच्या दारावर स्त्री स्कॉडचा एक स्टिकर देखील लावण्यात येणार आहे. या स्टिकरवर पोलिसाचे सर्व हेल्प लाईन नंबर दिले असतील. त्यामुळे आपल्या गल्लीत किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी महिलांची तसेच अल्प वयीन मुलींची होणारी छेडछाड होताना दिसल्यास पोलिसांशी त्वरीत संपर्क साधता येईल.