गोंदिया - लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना कठोर कारवाईची मागणी संपूर्ण देशभरातून होत असतानाच जिल्ह्यातील देवरी येथील डॉक्टरने आपल्याच रुग्णालयातील महिला कंपाऊंडरचे शारीरिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून देवरी पोलिसात नराधम डॉक्टरविरोधात बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरी येथे डॉ. शैलेंद्रकुमार इंद्रदेव सिंह (४४ वर्ष) नावाच्या व्यक्तीचे दातांचे रुग्णालय आहे. हे रुग्णालय तालुक्यात प्रसिद्ध आहे. या रग्णालयात पीडित महिला कंपाऊंडर म्हणून कार्यरत आहे. डॉ. शैलेंद्र सिंग पीडिता आपली मुलगी असल्याचे नेहमी भासवत होता. त्यामुळे ती त्यांच्या घरी नेहमी जात येत होती. याचाच गैरफायदा घेत डॉ. सिंग यांनी तिच्याशी अश्लील चाळे करत फोटो काढले. त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करून शरीर सुखाची मागणी करत होता.लैंगिक अत्याचार केल्यानंतर कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी देत होता. हा सर्व प्रकार पीडितेने आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर तत्काळ देवरी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तसेच पोलिसांनी डॉ. सिंग यांना ताब्यात घेऊन तक्रारीची शहानिशा केली. त्यानंतर रात्री उशिरा डॉक्टरला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर बलात्कार आणि अॅट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.