गोंदिया - जिल्ह्याच्या फुलचूर गावात दारुबंदी करण्यासाठी मतदान घेण्यात आले. महिलांनी सकाळी ८ वाजल्यापासून मतदानासाठी प्रचंड गर्दी केली होती. परंतु, गावातील दारू विक्रेत्यांनी न्यायालयात धाव घेत मतमोजणीवर स्टे ऑर्डर आणली आहे. त्यामुळे आता निकाल कोणत्या पक्षाच्या बाजून जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गावातील वाढती गुन्हेगारी आणि लहान मुलांना दारूच्या व्यसनाची सवय लागली आहे. यासाठी महिलांनी गावातील परवानाधारक आणि अवैद्य दारू विक्री करणाऱ्या दुकानदारावर अनेकदा मोर्चे काढले. संपूर्ण गाव दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गावातील दारू व्यवसायिकांनी दारू दुकाने बंद केली नाहीत. त्यामुळे महिलांनी कायदा हातात घेत गावात चालणाऱ्या अवैद्य दारू दुकानाच्या विरोधात मागील दीड वर्षापासून रात्री गस्त घालायला सुरुवात केली. यासाठी याबाबतचा ठराव देखील ग्रामपंचायतीकडून संमत करुन घेण्यात आला.
जिल्हा प्रशासनानेही गावकऱयांचे म्हणणे ऐकले. जिल्हाधिकाऱ्यांनी गावात दारूबंदी करण्याकरिता मतदान घेण्याचे ठरविले आणि यंत्रणा कामाला लावली. मात्र, मतदानाच्या एक दिवस आधी गावातील दारू विक्रेत्यांनी न्यायालयात धाव घेत मतदान प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत असल्याच्या आरोप केला. न्यायालयाने याबाबत मतदान घेण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाला आणि मतदान संघर्ष समितीला दिली आहे. मात्र, मतमोजणीवर स्टे ऑर्डर दिल्याने गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तर, मतदानाचा निकाल आमच्या बाजूने लागेल आणि गावात सुरू असलेल्या दारूच्या उभ्या बाटल्याला आडवी करून दाखवू, असा विश्वास गावातील महिलांनी व्यक्त केला आहे.