गोंदिया- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या किडंगीपार गावाशेजारी खासगी जमिनीत क्रशर मशीनच्या सहाय्याने व खाणीत सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम सुरू आहे. हे काम बंद करावे यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. कार्यवाही न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
अर्जुनी व किडंगीपार रस्त्याशेजारी खासगी शेत जमिनीत दगडाची खान लागली आहे. या ठिकाणी सुरुंग लावून दगड फोडले जात आहे. त्यानंतर ते मोठमोठे दगड क्रशर मशिनद्वारे बारीक करुन त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. दगडाला बारीक करण्याच्या प्रक्रियेमध्ये दगडांची धूळ उडते आणि लहनामोठे दगडाचे तुकडेही दूरवर फेकले जातात. या दगडांच्या धुळीमुळे किडंगीपार येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच शेतीलाही नुकसान होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ही मशीन रात्रदिवस सुरू राहत असल्याने गावातील लोकांना याचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे.
या क्रशर मशीनमुळे शासकीय संपत्तीचे नुकसान होऊ नये आणि गावातील नागरिकांचे आरोग्य तसेच शेती धोक्यात येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे व हे काम त्वरित बंद करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात येथील कंत्राटदाराला अनेक वेळा सांगण्यात आले. तरी सुद्धा कंत्राटदार, लोकप्रतिनिधी गावकऱयाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करीत आहे. तसेच या सुरुंगातून निघणाऱ्या दगडाच्या धुरामुळे रस्त्याने जाणाऱ्या लोकांना याचा फटका बसत आहे. क्रशर मशिन आणि खाजगी जागेमधील दगडाची खान गावापासून २०० मिटर अंतरावर आहे. यामुळे गावातील जनता व जवळच्या शेतकऱ्यांचे जीव धोक्यात आला आहे.
या खाणीजवळ जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा रस्ता आहे. या रस्त्याची वाहन क्षमता १० ते १२ टनाची असून या रस्त्यावरुन ४० ते ४५ टनाचे ओव्हर लोड ट्रक व टिप्पर गिट्टी वाहून नेत आहेत. यामुळे हा रस्ता पूर्णत: उखडला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर कोल्हापुरी बंधारा व पुल बांधला आहे. या पुलाची वाहन क्षमता कमी असून या पुलावरुन गिट्टीचे टिप्पर जात असल्याने हा पुल केव्हाही कोसळू शकतो. या संदर्भात तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांना वारंवार तक्रार व सुचना करण्यात आल्या. परंतु अधिकारी याकडे दूर्लक्ष करत आहेत.