गोंदिया - देवरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६ वरच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर सिरपूर चेक नाक्याजवळ एका ट्रक चालकाचा खून झाला. मंगळवारी (ता. ९) दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून देवरी पोलिसांनी या प्रकरणी ३ आरोपीना अटक केली आहे. जितेंद्र महाले असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे. त्याचा भाऊ संजय महाले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
या टोल नाक्यावर सद्भावना कंपनीद्वारे ट्रकची तपासणी आणि टोल संकलन केले जाते. येथे सद्भावना या कंपनीच्या काही लोकांनी ट्रक चालकाला मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. चालक जितेंद्र आणि त्याचा भाऊ संजय हे नागपूर येथील ट्रान्सपोर्ट रोडवेज येथे काम करतात. ट्रक चालक जितेंद्रने हिंगणघाटहून छत्तीसगडला जात असताना एका पादचाऱ्यास धडक मारल्यावरून त्याला मारहाण करण्यात आली. या व्यक्तीला धडक मारल्यानंतर ट्रक न थांबवता चालकाने तो सरळ टोल नाक्यापर्यंत आणला होता.
ट्रक टोल नाक्यावर आल्यानंतर चालकाचा भाऊ संजय पाणी आण्यासाठी गेला होता. यादरम्यान टोल नाक्यावरील लोकांनी पायी जाणाऱ्या व्यक्तीला धडक का मारली, असा जाब चालकाला विचारत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यातच त्याचा मृत्यू झाला. पाणी आणायला गेलेला चालकाचा भाऊ परत आल्यावर त्याने आजूबाजूला चौकशी केली असता, काही लोकांनी त्याला मारहाणीविषयी सांगितले. यानंतर त्याने भावाचा शोध घेतला असता, जवळच्या एका झाडाजवळ त्याला भाऊ जितेंद्र निपचित पडलेला आढळला.
चालकाच्या भावाने देवरी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा करत ३०२, ३४ भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करून सद्भावना कंपनीच्या राहुल पांडे व अमित घंटारे, दारूबंदी विभागाचे कॉन्स्टेबल प्रफुल सहारे अशा ३ लोकांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर हे करीत आहे.