गोंदिया- गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी शेजारच्या मध्यप्रदेशील बालाघाटमध्ये आपली दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या भागात नक्षली कारवाया करणाऱ्या नक्षल्यांना साहित्य पुरवठा करणाऱ्या 8 जणांना किरनापूर पोलिसांनी गेल्या आठवड्यात ताब्यात घेतले होते. त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील दोघांचा समावेश होता. या आरोपींच्या चौकशीनंतर बालाघाट पोलिसांनी या प्रकरणी गोंदिया जिल्ह्यातून एका माजी नगरसेवकासह आणखी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या साहित्य पुरवठा प्रकरणात एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील 6 आरोपींचा समावेश आहे.
नक्षल समर्थक म्हणून गोंदियातील आणखी तिघांना गोंदिया-बालाघाट पोलिसांची संयुक्त कारवाई करीत अटक केली आहे. छत्रसाल उर्फ बंटी मोहन बानेवार (४८) रा. माडी मोहल्ला चावडी चौक छोटा गोंदिया, लक्ष्मीनारायण उर्फ बाळू दिगंबर कुंभारे (५३) रा. साई खापर्डे कॉलनी कुडवा व राजेश गोपीचंद पाटील (५१) रा. आंबेडकर चौक कुडवा या तिघांना अटक केली आहे. नक्षलवाद्यांना शस्त्र पुरविणाऱ्या आठ जणांना बालाघाट पोलिसांनी ७ जुलै रोजी अटक केली होती. त्या घटनेचे धागेदोरे गोंदियापर्यंत लागले. त्यावेळी गोंदियातील घनश्याम आचले व विजय कोरेटी या दोघांना ७ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात गोंदियातील आणखी तिघांना नक्षल समर्थक म्हणून अटक करण्यात आली आहे. बालाघाट जिल्ह्याच्या किरनापूर-किनी जंगलात नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा करण्यासाठी फिरत असलेल्या आठ जणांना बालाघाट पोलिसांनी अटक केली होती.
शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली-
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तीन पिस्तूल, तीन मॅक्झिन, एके ४७, आठ मोबाईल, चारचाकी असलेले दोन वाहने, एलईडी टॉर्च, हवा पंप, एमपीथ्री प्लेयर, पर्स, सुटकेस, कापड भरलेल्या तीन बॅग असे साहित्य जप्त करण्यात आले होते. नक्षलवाद्यांना पावसाळ्यापूर्वी ५ हजार काडतुसे, पिस्तूल, शस्त्रे दारुगोळा, शिबीर लावण्याचे साहित्य पुरविण्यासाठी एक कोटी रुपयांचा सौदा झाला होता. यातील ३० लाख रुपयाचे सामान मागील सहा महिन्यात नक्षलवाद्यांना पुरविल्याची माहिती आहे.
या प्रकरणात नक्षल समर्थक म्हणून काम करणाऱ्या गोंदियातील तिघांना अटक करण्यात आली. ही कारवाई गोंदिया बालाघाट पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. गोंदियाचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, बालाघाटचे पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी, नक्षल विरोधी अभियान पथक गोंदियाचे शरद पाटील, बालाघाटचे पीएसआय उके यांनी केली आहे.यातील मुख्य आरोपी असलेल्या व्यक्तीच्या सुचनेवरुन लपवून ठेवण्यात आलेले साहित्यासाह 1 बंदुक व 490 काडतूस चौकशीदरम्यान हस्तगत करण्यात आले असून बोरबन जंगल परिसरातून हे साहित्य नक्षल्यापर्यंत पोचविण्यात येत असल्याचे समोर आले आहे.