देवरी (गोंदिया)- तालुक्यातील चिचगड रोडवरील परस टोल्याजवळ एका संशयित वाहनातून १६ हजाराचा सुगंधित तंबाखूसाठा देवरी पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (२७ ऑगस्ट) सांयकाळी ५ च्या सुमारास झाली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
चिंचगड रस्त्यावरील कृष्णा हार्डवेअर समोर पोलिसांना एक टाटा सुमो (क्र. सीजी. ०७ एम १८९८) संशयितरित्या आढळून आली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात २ प्लास्टिक पोत्यांमध्ये तंबाखूची २०० पाकिटे आढळली. प्रत्येक पाकिटांची किंमत ८० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी ही सर्व पाकिटे व अडिच लाख किंमत असलेली टाटा सुमो जप्त केली आहे. तसेच एका आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी देवरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक किशोर लिल्हारे यांच्या तक्रारीवरून देवरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी