गोंदिया - नागझिरा अभयारण्याच्या सीमेवरील गोंदिया तालुक्यातील चुटिया आणि लोधीटोला येथील शेतशिवारात वाघ मृत अवस्थेत आढळून आला होता. घटनास्थळावरून वाघाचे काही अवयव बेपत्ता होते. आरोपींनी विद्युत करंट लावून वाघाची शिकार केली होती. त्यानंतर वाघाचे अवयव कापून पुरावे नष्ट प्रयत्न करण्यात आला होता. या दरम्यान वन विभागाने वाघाच्या हत्ये प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले होते.
आरोपींची कसून चौकशी केली असता, वाघाची विद्युत करंटने शिकार केल्याची बाब समोर आली आहे. तिन्ही आरोपींकडून विद्युत तार व वाघाचे अवयव कापण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींमध्ये रोशनलाल खेमलाल बघेले, मुकेस रोशनलाल बघेले (दोन्ही रा. लोधीटोला) व बालचंद सोनु राणे (रा. चुटिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वाघाचे मुंडके व अवयव होते गायब -
गोंदिया तालुक्यातील लोधीटोला आणि चुटिया येथील शेतशिवारात एक वाघ मृतावस्थेत आहे, अशी माहिती वनविभागाला १४ नोव्हेंबरच्या रात्री मिळाली होती. दरम्यान १५ नोव्हेंबर रोजी घटनास्थळ गाठून वनविभागाने पंचनामा केला असता, वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तसेच वाघाचे मुंडके व काही अवयव बेपत्ता असल्याचे दिसून आले. यावरून वन विभागाने वाघाचे मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास कार्याला सुरूवात केली. दरम्यान श्वान पथकाच्या माध्यमातून वाघाच्या शरीराचे काही अवयव आणि वाघाचा मृत्यूबाबत काही उलगडा करण्यात आला.
कुऱ्हाडीच्या सहाय्याने वाघाच्या शरीराचे केले तुकडे -
या प्रकरणात संशयाच्या आधारावर रोशनलाल बघेले व मुकेश रोशनलाल बघेले या दोन्ही बाप-लेकांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान कसून चौकशी केली असता विद्युत करंटने वाघाची शिकार केल्याची बाब कबुली केली. शिकार झालेल्या वाघाला इंदुताई निर्मला ढेकवार यांच्या शेतात आणण्यात आले दरम्यान बालचंद राणेच्या मदतीने वाघाचे अवयव कुऱ्हाडीच्या सहाय्याने वेगळे करण्यात आल्याची माहिती दिली. आरोपींकडुन शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या विद्युत तार व कुऱ्हाड असे आदी साहित्य जप्त करण्यात आले. त्याच प्रमाणे आरोपींकडून शिकार करण्यात आलेले ठिकाण व कापण्यात आलेले अवयवच्या ठिकाणी सहानिशा करण्यात आली.
३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी -
या प्रकरणात तिन्ही आरोपींविरुध्द वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना आज २७ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असून आरोपींना न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे, त्याच प्रमाणे लंपास असलेल्या वाघाच्या अवयवांचा शोध वन विभाग घेत आहे.