गोंदिया - मागील ११ दिवसांपासून गोंदियात सुरू असलेले विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळू लागले आहे. शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी गोंदिया जिल्हा परिषदेसमोर सोमवारी अर्धनग्न आंदोलन करत शासनाविरोधात चांगलाच संताप व्यक्त केला. दरम्यान, 21 ऑगस्टपर्यंत त्यांच्या वेतनाचा मुद्दा निकाली लागला नाही तर, सामूहिकरित्या आत्मदहन करण्याची इशारा देखील यावेळी त्यांनी दिली.
मागील ११ दिवसात २ शिक्षकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, तरी देखील शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे शिक्षकांनी सोमवारी जिल्हा परिषदेसमोर अर्धनग्न आंदोलन करून शासनाविरुद्ध आक्रोश व्यक्त केला. अनेक शिक्षकांची वयोमर्यादा सेवानिवृत्तीपर्यंत पोहोचली, मात्र ते अजूनही नोकरीत स्थायिक झाले नाहीत. तर, १५-२० वर्षे फुकट नोकरी केल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा झाला आहे.
या अर्धनग्न आंदोलनादरम्यान शिक्षकांनी शासनाला २१ तारखेचा अल्टिमेटम दिला आहे. सोबतच कॅबिनेट बैठकीत मागण्या पूर्ण न झाल्यास गोंदिया जिल्हा परिषदेसमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे. सरकार त्यांच्या आंदोलनाची दखल घेईल का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.