गोंदिया - देवरीकडून गोंदिया येथे जात असलेल्या एसटी महामंडळच्या बसला अंजोर गावाजवळ अपघात झाला. या अपघातात ३० ते ४० गंभीर जखमी झाले. अपघाता वेळी बसमध्ये ५० ते ५५ प्रवासी व शाळेतील विद्यार्थी प्रवास करत होते.
बस चालक-वाहक आणि काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना सातगाव येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या प्रवाश्यांना साखरीटोला येथील आरोग्य केंद्रात दाखल केले.
देवरी-आमगाव या रस्त्याचे काम मागील एक वर्षापासून सुरू आहे. हे काम पुण्याच्या पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीकडे देण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. रस्त्याचे काम सुरू असताना वाहनांना जाण्यासाठी पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात होत असतात.
हेही वाचा - भाजपला झटका माजी खासदार बोपचेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, तिरोड्यातून निवडणुकीच्या रिंगणात
झालेल्या बस अपघाताच्या ठिकाणी एकीकडे रस्त्याचे काम सुरु आहे, दुसऱ्याबाजूने वाहनांची ये-जा आहे. अपघातग्रस्त एसटी चालक हा समोरून येत असलेल्या वाहनाला जागा देण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नात एसटी रस्त्याच्या खाली जावून पलटली.