गोंदिया - लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या सर्वत्र रद्द करण्यात आल्या होत्या. हिंगोली जिल्ह्यातही बस फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यात गोंदिया जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये आहे. त्यामुळे येथे सर्शत एसटी सेवेला परवानगी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने, तब्बल ४० दिवसानंतर आज (६ मे) पासुन 'लालपरी' गोंदिया जिल्ह्याच्या रस्त्यावर धावू लागली आहे. सुरूवातीला आज फक्त २५ फेऱ्या सुरू केल्या असून उद्यापासून ५२ बस फेऱ्या सुरु होणार आहे. तसेच या बस फेऱ्या सकाळी ७ तर सायंकाळी ७ वाजेपर्यंत फक्त जिल्हांतर्गत सुरु असणार, असे गोंदियाच्या आगार प्रमुख संजना पटले यांनी सांगितले.
हेही वाचा... मुंबईचे उपरे मालक संकटकाळी पलायन करत आहेत !
लॉकडाऊनमुळे रेल्वे, जहाज, बस आणि विमान सेवाही बंद करण्यात आली होती. परिणामी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस देखील बंद होत्या. अशा सेवा बंद केल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी आता शासनाकडुन ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये काही प्रवास सेवा सुरू करण्यास तयारी दर्शवली आहे. गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने या जिल्ह्यात काहीप्रमाणात शिथीलता देण्यात आली असुन बस सेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया आगाराला जिल्ह्यांतर्गत बस फेऱ्या सुरू करण्यास अनुमती दिली आहे.
प्रवाशांना दिलासा...
प्रवासाची साधने बंद असल्याने मजुर, सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत होता. मजुरांचे लोंढे तर पायीच इच्छित स्थळी जाताना दिसत आहेत. मात्र, आता एसटी बससेवा सुरु झाल्याने बुधवारपासुन प्रवाशांना बसने प्रवास करता येईल.