गोंदिया - नगर परिषद येथील बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा त्यांना लाभ मिळावा, यासाठी कामगार नोंदणी केली जात आहे. यांतर्गत नगर परिषदेत शहरी भागातील कामगारांचे अर्ज स्वीकार केले जात आहेत. मात्र, यामध्ये बोगस सही व शिक्क्यांचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर असे असतानाही नगर परिषद प्रशासन अद्याप गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा - राजेंच्या पक्षप्रवेशाला पंतप्रधानांऐवजी कोण आले? धनंजय मुंडेंच्या 'या' प्रश्नाला जनतेने दिले असे उत्तर
महाराष्ट्र इमारत व इंतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगार नोंदणी केली जात आहे. यासाठी कामगार आयुक्त कार्यालयात ग्रामीण तर शहरासाठी नगर परिषद कार्यालयात अर्ज स्वीकारले जात आहेत. यासाठी नगर परिषदेत काही व्यक्ती कामगारांना अर्ज भरून देण्याचे काम करीत आहेत. कंत्राटदाराचा शिक्का व त्यांची सही असलेला अर्ज नगर परिषदेतील बांधकाम विभागातील एका अभियंत्याकडे द्यायचा आहे. मात्र, काही अर्जांवर नगर परिषद कनिष्ठ अभियंत्यांचा शिक्का आणि त्यावर बोगस सही मारण्यात आल्याचे नगर परिषदत अभियंत्यांच्या लक्षात आल्याची माहिती आहे.
हेही वाचा - मनसेचं अस्तित्वच धोक्यात? नेते संभ्रमात तर कार्यकर्ते कोमात!
यातुनच अर्जावर संबंधित व्यक्ती परस्पर बोगस सही व शिक्के मारून अर्ज पाठवित असल्याचा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत नगर परिषदेत चर्चा सुरू आहे. संबंधित अभियंत्यांकडून एक दोनच असे अर्ज निदर्शनास आल्याचे बोलले जात आहे. तर, या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास आणखीही अर्ज मिळतील, असे नगर परिषदेतच बोलले जात आहे. मात्र, असे असतानाही नगर परिषद प्रशासन गप्प बसून आहे. योजनांचा लाभ मिळणार या आशेने कामगार नोंदणीसाठी नगर परिषद कार्यालयात गर्दी करीत आहेत. नेमका याचा फायदा घेत काही व्यक्ती या गरीब कामगारांकडून पैसे उकळले जात असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, नगर परिषदेत याबाबत उघड चर्चा सुरू आहे.