गोंदिया - सालेकसा तालुक्यातील मुंडीपार येथे आज (14 जून) पहाटे दुर्देवी घटना घडली. गाड झोपेत असलेल्या मोहारे कुटुंबियातील एका 33 वर्षीय महिलेसह तिच्या 11 वर्षीय मुलाचा विषारी सापाने चावा घेतला. दोघांनाही उपचारासाठी जिल्ह्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, मुलाचा रस्त्यातच तर त्याच्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंडीपार गावात एकच शोककळा पसरली आहे. सतवन दिलीप मोहारे (33 वर्षे) आणि दीपक दिलीप मोहारे (११ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
विषारी सापालाही मारले
सालेकसा तालुक्यातील मुंडीपार येथील मोहारे कुटुंब काल (13 जून) रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे झोपले. रात्री २ वाजण्याच्या सुमारास सतवन दिलीप मोहारे व दीपक दिलीप मोहारे या दोघांनी काहीतरी चावल्याचे अनुभवले. याची माहिती त्यांनी कुटुंबियांना दिली. यावरून कुटुंबियांनी काय चावले, याचा शोध घेतला. तर विषारी साप असल्याचे दिसून आले. यानंतर सापाला मारण्यात आले. तर दुसरीकडे सतवन व दीपक या दोन्ही माय-लेकराची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रस्त्यातच दीपकचा मृत्यू झाला. सतवन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची नोंद सालेकसा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार लिल्हारे करत आहेत.
हेही वाचा - मुंबई : दंड न भरणाऱ्या व्यक्तींच्या दारी येणार वाहतूक पोलीस