गोंदिया - सध्या शेती मशागतीला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्याला मजुरीचा खर्च पुरत नाही आहे. तर काही ठिकाणी मजुरांना जास्त वेळ शेतात राबवले जात आहे. या त्रासापासून मजूर आणि शेतकऱ्याची सुटका करण्यासाठी जिल्ह्यातील पांढराबोडी ग्रामपंचायतीने एक अभिनव असा निर्णय घेतला आहे. नागरटी, खारी खोदने, रोहणीचे मजुरूचे दर निश्चित, कामाचा वेळाही ठरल्यात आले आहे. काय आहे नेमकी बातमी बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये...
मजूरांना आणि शेती मालकांना दिलासा -
एखाद्या कोरपोरेट कंपनीमधील कर्मचाऱ्याचे कामाचे तास व त्यांचे वेतन निश्चित असते हे आपण नेहमी बघत असतो. मात्र हेच नियम आता शेतमजुरांची लावण्यात आले आहेत. सरकारी काम असो वा खासगी काम, यामध्ये मजुरांचे शोषण आणि पिळवणूक होणारच यात दुमत नाही. मात्र गोंदिया जिल्ह्यातील पांढराबोढी ग्रामपंचायतीने नवी शक्कल लढवत शेतमजूरांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा आणि मजुरांनीही कामावर वेळेत यावे. यासाठी ग्रामपंचायतीने एक विशिष्ट ठराव घेत शेती मशागतीच्या कामाची निश्चित मजुरी ठरवून दिल्याने शेती मशागतीची कामे करणाऱ्या मजूरांना आणि शेती मालकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.
ग्रामपंचायतीने केला ठराव पारीत -
गोंदिया तालुक्यांतर्गत येत असलेल्या पांढराबोढी ग्रामपंचायतने एक नाविण्यपुर्ण उपक्रम राबविला आहे. या उपक्रमात आता हे गाव नवीनच उपक्रमामुळे राज्यात चर्चेला आले आहे. गोंदिया जिल्हा हा भाताचा कोठार म्हणून अशी संपूर्ण राज्यात ओळखला जातो. खरीपाच्या हंगामात गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात येते. त्यामुळे शेतीमशागतीच्या कामासाठी मजुरांचीही मागणी मोठी असते. तेव्हा आपली रोवणी आधी व्हावी यासाठी शेतकऱ्यांमध्ये जणू स्पर्धा लागली असते. दरम्यान कमी अधिक दर देवून मजूरांची पळवापळवी सुद्धा होत असते. या मुळे मंजूरांना शोषण आणि पिळवणुकीला सुद्धा सामोरे जावे लागते. त्याच प्रमाणे शेतमालकाला देखील अनेकदा ज्यास्त पैसे मोजावे लागते, यावर तोडगा म्हणून पांढराबोढी ग्रामपंचायतीने चक्क ठराव पारीत करून गावात कोतवालांच्या माध्यमातून दवंडी देखील दिली. शेतमजूरांना समान काम समान मोबदला देण्यात यावा यासाठी निश्चित दर सुद्धा ठरवून दिले आहेत.
असे आहेत दर व कामाची वेळ -
नागरटीसाठी ७५०० प्रति महिना, खारी खोदणाऱ्या साठी ३०० रूपये प्रति कोंडा (मग एका दिवसात दोन कोंडे देखील खोदु शकतो) तर रोहणी लावणाऱ्या मजुरासाठी १२० रूपये दिवस मजुरी देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत ह्या कामाच्या वेळासुद्धा ठरवून दिला आहे. मजूरांनी वेळेवर कामावर यावे एकदा मजूर शेतीच्या कामावर वेळेवर न पोहचल्यास त्याचे २० रूपये कापण्यात येणार असल्याचे हि या ठरावात निर्णय घेण्यात आले आहे.
नियमांचे उलंघन करणाऱ्याला दंड -
ग्रामपंच्यायतीने ठरवून दिलेल्या नियमांचा उलंघन करणाऱ्या शेतकऱ्याला दंड देखील ठोठाविण्यात येणार आहे. सरकारी आणि खासगी कामाप्रमाणे शेतीच्या कामावर काम करणाऱ्या शेतमजूरांसाठी समान काम समान वेतन असा पांढराबोळी ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारी ही राज्यात पहिली ग्राम पंचायत असावी.