गोंदिया - जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुजारीटोला, कालीसरार, संजयसरोवर धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवरील पूल बंद करण्यात आला आहे.
रावणवाडी येथे महाराष्ट्र पोलिसांनी मध्यप्रदेशला जाणाऱ्या किंवा पाणी बघण्यासाठी जाणाऱ्या लोकांना थांबवले आहे. रावणवाडी पुलाच्या एक किलोमीटर अलिकडे बॅरिकेट्स लावण्यात आली आहेत. त्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी बाघ नदीवरील मोठ्या पुलावर जाण्याचा प्रयत्न करू नये. जोपर्यंत पुलावरील पाणी कमी होत नाही तोपर्यंत वाहनांना मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती रावणवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सौरभ सेठे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वैनगंगा आणि बाघ नदीच्या काठावरील गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात बचाव पथकाच्या 26 जणांची तीन पथके पाठवण्यात आली आहे. आणिबाणीच्या प्रसंगी शोध व बचाव कार्यासाठी एक पथक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात राखीव ठेवण्यात आली आहे.