गोंदिया - रेल्वे स्थानक कोरबा येथून बालाघाटला जाण्यासाठी निघालेली 25 वर्षीय महिला, पती व लहान मुलीसह गोंदियाला पोहोचली. लहान मुलीसाठी खाऊ घेऊन येते असे सांगून फलाटावरून गेली व परतलीच नाही. त्या बेपत्ता महिलेचा अवघ्या 2 दिवसांत रेल्वे पोलिसांनी शोधून काढले व तिच्या पतीच्या ताब्यात काल रविवार, 30 मे रोजी दिले.
गोंदियाच्या रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार
सविस्तर माहिती अशी की, सविता प्रकाश गेडाम (वय 25) रा. वॉर्ड-13, निलजी, बालाघाट (म.प्र.) ही 23 मे रोजी आपला पती व लहान मुलगी आकांक्षा हिच्यासह कोरबा रेल्वे स्थानकातून बालघाटला जाण्यासाठी निघाली. ते सर्व गोंदिया रेल्वे स्थानकात पोहचले. लहान मुलीसाठी नाश्ता घेऊन येते, असे पतीला सांगून त्यांचा मोबाइल घेवून ती गोंदिया रेल्वे स्थानाकाच्या प्लॉटफार्म-1 च्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर गेली. परंतु, बराच वेळ होवूनही ती परत न आल्याने तिच्या पतीने स्थानक परिसरात शोधाशोध केली. तरी ती न मिळाल्याने तिचे पती प्रकाश उदयचंद गेडाम (रा. निलजी बालाघाट) यांनी गोंदियाच्या रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी 27 मे रोजी महिला हरवल्याचे प्रकरण दाखल केला. तपास पोलीस हवालदार अजय बर्वे करीत होते.
मोबाइल लोकेशनद्वारे व गोपनीय बातमीदाराच्या मार्फत महिलेचा शोध
गोंदिया रेल्वे ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांना 28 मे रोजी गोपनीय माहिती मिळाली की, सदर महिला तिच्या नातेवाईकाकडे बालाघाट (मध्य प्रदेश) येथे आहे. त्यावरून सायबर सेल लोहमार्ग नागपूर यांच्याकडून मदत घेऊन लोहमार्ग नागपूरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून स्टाफसह परराज्यात तपासकामी जाण्याची परवानगी घेण्यात आली. त्यानंतर काल 30 मे रोजी सदर महिलेच्या मोबाइल लोकेशनद्वारे व गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती घेऊन सदर महिलेचा शोध घेऊन तिला गोंदियाच्या रेल्वे पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तसेच कायदेशीर कार्यवाही करून तिला तिच्या पतीच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कार्यवाही लोहमार्ग नागपूरचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.व्ही. शिंदे तसेच प्रभारी अधिकारी संदीप गोंदणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार अजय बर्वे, पोलीस हवालदार संतोष चौबे, पोलीस शिपाई ओमप्रकाश सेलोटे, नंदकिशोर नारनवरे, अखिलेश राय, मनोज गौतम, सुनीता मडावी यांनी केली.