गोंदिया - नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह गोंदिया भंडारा जिल्ह्यातील नवनिवार्चित सर्वच आमदारांचा सत्कार माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. आपापसातील मतभेद विसरून जिल्ह्याचा कायपलट करण्याचे आवाहन यावेळी पटेल यांनी नवनिर्वाचित आमदारांना केले.
प्रफुल्ल पटेल यांनी महाविकास आघाडी तयार करताना ४ आठवड्याच्या कालवधीत जे शिकायला मिळाले ते ४० वर्षाच्या राजकारणात शिकलो नसल्याचे सांगितले. तसेच नाना पाटोले यांनी मोठा संघर्ष करून हे पद मिळवल्याचे पटेल यांनी सांगितले.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जनतेने सदैव आपल्याला प्रेम दिले. त्यांनी नेहमीच आपल्यावर विश्वास व्यक्त केला आहे. विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा संविधानानुसार पुरेपूर उपयोग करून जनतेचे ऋण फेडण्याची संधी आता गमविणार नसल्याची ग्वाही यावेळी पटोलेंनी दिली. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सत्कार म्हणजे एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. तसेच आईच्या दुधाचे कर्ज मुले मोठे झल्यावर फेडतात तसे या पदावर विराजमान झाल्याने जनतेचे कर्ज फेडणाची वेळ आली असल्याचे नाना पाटोले म्हणाले.