गोंदिया - जिल्ह्यात आज १८९ ग्राम पंचायतींसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदारांनी मतदानाचा हक्क बजवण्यास सुरवात केली आहे. मात्र, सध्या थंडीचे दिवस असल्याने सकाळी मतदान केंद्रावर फारशी गर्दी दिसली नाही. ११ वाजल्यानंतर मतदान केंदावर गर्दी वाढत आहे.
गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, आमगाव या चार तालुक्यात सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची वेळ आहे. तर नक्षलग्रस्त अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक अर्जुनी आणि सालेकसा तालुक्यात सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ ठेवण्यात आली आहे. या निवडणुकीत ३ हजार १५१ उमेदवार रिंगणात असून ३५३ मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. ३ लाख २२ हजार ९९९ मतदार मतदानाचा हक्क बजावातील.
पोलिसांचा चोख बंदोबस्त -
ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांतता पूर्व वातावरणात पार पडाव्यात यासाठी १३९ पोलीस अधिकारी, १ हजार ३०० पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच नक्षलप्रभावित भागात जास्त बंदोबस्त करण्यात आला आहे. तर, काही अतिरिक्त तुकड्याही तैनात करून ठेवल्या आहेत.