गोंदिया - विविध युटय़ूब चॅनलकरीता काम करणारे एक पत्रकार व छायाचित्रकार व्यक्तीसह त्यांच्या मुलाच्या घरावर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या एका पथकाने अचानक भेट दिली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह गृहमंत्री व मानवाधिकार आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. कोणताही आदेश नसताना रात्री 12 वाजता आपल्या कृष्णपुरा वार्डातील घरावर व मुलगा ज्याठिकाणी भाड्याने वास्तव्यास असतो त्याठिकाणी जाऊन पोलिसांनी मानसिक त्रास दिल्याचे पत्रकाराने म्हटले आहे.
एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरु असल्याने कोणीही कोठे जाऊ शकत नाही. मात्र, पोलीस या गोष्टीचा गैरफायदा घेत दहशत निर्माण करुन जोरजोराने आवाज देत घराचे दार ठोठावत होते. जोरजोराने दार ठोठावल्याने झोपेत असलेल्या आपल्या सुनेने व मुलाने दार उघडले. त्रास देण्याची ही काय पद्धत आहे काय, असा प्रश्न करताच पोलीस त्याठिकाणाहून परतले. त्यावेळी त्यांच्यासोबत एकही महिला पोलीस नव्हती. त्यातच वरच्या रुममधून खाली येत असताना आपला मुलगा पायऱ्यांवरून खाली पडल्याने त्याच्या पायाला व डोक्याला मार लागला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पत्रकाराच्या सुनेने याप्रकरणात रात्रीच्यावेळी घरी येत दडपशाहीने त्रास देणाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.
यासंदर्भात, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रमोद घोंगे यांनी सांगितले की, देवरी पोलिसांना एका प्रकरणात तपास करावयाचा असल्याने तेथील अधिकारी व पोलीस आलेले होते. त्यांच्यासोबत फक्त आपला स्थानिक क्षेत्रातील व्यक्ती असल्यामुळे पोलीस कर्मचारी गेलेला होता.