गोंदिया - जिल्ह्यातील ४९ बंधपत्रित परिचारिकांनी स्थायी करण्याच्या मागणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात आंदोलन केले. शासनाने बंधपत्रीत परिचारिकांना सामावून घेताना भेदभाव केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातंर्गत येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण संशोधन केंद्र (डीएमईआर), केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, बाई गंगाबाई महिला रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात कार्यरत ४९ बंधपत्रित परिचारिकांनी स्थायी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. 19 एप्रिल 2015 पर्यंतच्या सर्व बंधपत्रित परिचारिकांना स्थायी करण्यात आले. मात्र, 5 मे 2015 रोजी लागलेल्या बंधपत्रित परिचारिकांना वगळून शासन अन्याय करत असल्याचे या परिचारिकांचे म्हणणे आहे. या तिन्ही रुग्णालयात कार्यरत ४९ परिचारिकांपैकी 25 च्या जवळपास बंधपत्रित परिचारिका या 5 मे 2015 च्या काळात लागलेल्या असून, त्यांना अद्यापही शासन सेवेस स्थायी करण्यात आलेले नाही. स्थायी परिचारिकांसारखेच काम यासुध्दा परिचारिका करत आहेत. तर दुसरीकडे कोरोनासारख्या काळातही परिचारिका सेवा देत आहेत.
या बंधपत्रित परिचारिकांचे गेल्या दोन महिन्यापासूनचे वेतनसुद्धा मिळाले नाही. त्यामुळे आपले घर कसे चालवायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. कोरोनामुळे सगळे काम बंद आहे. अशा स्थितीत परिचारिका आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे शासनाने आमची दखल घ्यावी, अशी मागणी परिचारिकांनी केली आहे.