गोंदिया - देशातील नक्षल चळवळीवर प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे म्हणून केंद्र व राज्य सरकारकडून नक्षल आत्मसमर्पण योजना चालविली जात आहे. त्या अंतर्गतच कोरची तालुक्यातील २७ वर्षीय जगदीश उर्फ महेश विजय अगणू गावडे या नक्षलवाद्याने आज (२७ मे) अतिरिक्त जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केले आहे. तसेच आजपर्यंत गोंदियामध्ये १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
मूळचा गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील मसेली गावाचा रहिवाशी असलेला जगदीश २०१२ मध्ये नक्षलवाद्यांच्या संपर्कात आला. १५ दिवस आमच्यासोबत फिरायला जंगलात चल म्हणून नक्षली त्याला घेऊन गेले, २०१२ नंतर मात्र तो नक्षलांच्या भीतीने गावी येऊ शकला नाही. शेवटी जगदीशने नक्षल चळवळीत सहभाग नोंदवत तीन पोलिसांना ठार केले. त्यामुळे त्याला नक्षल केंद्रीय समितीचे सदस्य मिलिंद तुमडाम यांचा अगरक्षक म्हणून के. कुरखेडा, कोरची, ककोडी दलममध्ये काम केले. नक्षलवाद्यांना स्थानिक तेंदू पत्ता तसेच रस्ते बांधकाम व्यावसायिक पैसे पुरवत असल्याची माहिती जगदीशने दिली.
महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड झोनअंतर्गत येत असलेल्या गोंदिया-राजनांदगाव-बालाघाट डिव्हिजनमध्ये कार्यरत नक्षल संघटनेच्या के. के. डी. प्लाटून सदस्य जगदिश उर्फ महेश उर्फ विजय अगनू गावडे (रा. बोडेना ता. कोरची, जि. गडचिरोली) हा नक्षलवादी ६ घटनामध्ये सहभागी होता. जगदिशने प्लाटून विस्तारासाठी बस्तर व गडचिरोली जिल्ह्यात काम करुन २२ युवकांना या नक्षल चळवळीत जोडल्याचेही त्याने सांगितले. कोरची दलममध्ये सध्या १० ते ११ जणांचा समावेश असून ३ महिलांचा समावेश असल्याची माहितीही दिली. नक्षलवाद्यांचे केंद्रीय कमिटी सदस्य मिलिंद तेलतुंबडे याच्याकडे तो अंगरक्षक म्हणूनही राहिला आहे. सध्या विस्तार पी.एल. ३ सदस्य म्हणून कार्यरत होता. छत्तीसगडमधील भावे गावाजवळ झालेल्या चकमकीत ३ पोलीस शहीद झाले होते. त्यात जगदीशच्या दलमचा सहभाग होता.
२०१२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात फुलगोंदी, लेकुरबाडी, कैमुल येथील पोलीस चकमक, टिपागड, बालाघाट जिल्ह्यातील बगरझोला फायरिंगमध्ये हा व त्याचा दलम सहभागी असल्याची माहिती त्याने दिली. तर २०१२ मध्ये नक्षल चळवळीत गेलेल्या या युवकाने १६ फेबुवारी २०१९ मध्ये अप्पर पोलीस अधीक्षकांच्या समोर आत्मसमर्पणाची तयारी केली आणि पोलिसांच्या संपर्कात आला. त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे व पोलीस विनिता साहू यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले.
येत्या काही दिवसात पोलिसांची नक्षल विरुद्ध होणाऱ्या कारवाई पाहता जगदीशने हातातील बंदूक सोडून समाजच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी गोंदिया पोलिसासमोर आत्मसमर्पण करण्यासाठी हजर झाला आहे. जगदीशला गोंदिया पोलिसातर्फे नक्षल आत्मसमपर्ण योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. गेल्या २० वर्षात गोंदिया जिल्ह्यात १९ नक्षल वाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.