गोंदिया - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन ठेवण्यात आले. या काळात गोंदिया शहरात अडकलेल्या ३०० च्या वर आश्रितांना सकाळ आणि सायंकाळी योगशिक्षिका माधुरी वानकर या योगसेवा देत आहेत. त्यांच्या योगसेवेने आश्रितांचे मनोबल वाढले असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाने अनेक आदेश लागू केले आहे.
या संचारबंदी काळात शहरातील अनेक ठिकाणी परराज्यात कामाच्या शोधात गेलेल्या मजुरांची कुटुंबे अडकली आहेत. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वत्र प्रयत्न सुरू असताना विवेक मंदिर शाळेतील योगशिक्षिका माधुरी वानकर आश्रितांना योगसेवा देत आहेत. दरदिवशी योगाभ्यासात आसन, प्राणायाम, ध्यान, मुद्रा, अॅक्युप्रेशरने त्यांचे आरोग्य उत्तम ठेवत आहेत. गेल्या 1 महिन्यापासून त्या आश्रितांना योगसेवा देत आहेत. कोव्हीड-१९ चा योग अभ्यासक्रम नियमित करवून घेत असल्याने हार्ट, बीपी, किडनी, थायरॉईड आजाराच्या रुग्णांचे आंतरिक मनोबल वाढले आहे.
जिल्हा योग असोसिएशन सहसचिव, पतंजली सदस्य, आंतरराष्ट्रीय योगपटू, पंच प्रशिक्षक असलेल्या योगशिक्षिका माधुरी वानकर यांना जिल्ह्यातील योगप्रशिक्षक म्हणून ओळखले जाते. जिल्हा रोग संघटनेव्दारे तसेच राजगिरी सामाजिक संस्थेव्दारे शहरात 4 ठिकाणी असलेल्या 300 हून अधिक आश्रितांना त्या योगाचे धडे देत आहेत.