गोंदिया - देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि तोंडावर मास्क लावण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राज्याचे मंत्री आणि लोकप्रतिनिधीच या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करताना दिसूत आहेत.
राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनिल केदार हे मागील पाच महिन्यापासून बंद असलेल्या गोंदियातील दुधसंकनल केंद्राच्या पुनःशुभारंभ कार्यक्रमासाठी आले होते. यादरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणून खासदार सुनिल मेंढे, आमदार विनोद अग्रवाल, मनोहरराव चंद्रिकापुरे आणि सहसराम कोरेटे हेही उपस्थित होते. मात्र, या शुभारंभ कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडावर मास्क न वापरता मंत्री आणि आमदारांनी गाठीभेटी घेतल्या.
यावरुन सर्वसामान्य नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करणारे शासनाचे प्रतिनिधीच नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र समोर आले. या कार्यक्रमासाठी 100 पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती होती. जमावबंदी असताना या कार्यक्रमाला शेकडोंची उपस्थिती कशी? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. या कार्यक्रमाला दुग्धविकास विभागाचे अनेक अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. मात्र, एकाही अधिकाऱ्याने सोशल डिस्टन्स पाळला नाही.